अपघातग्रस्त कुटुंबीयांना बोईंगकडून 689 कोटींची नुकसानभरपाई

    दिनांक :04-Jul-2019
न्यूयॉर्क, 
गेल्या वर्षभरात बोईंग कंपनीच्या दोन 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातांमुळे या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, या विमानांची निर्मिती करणार्‍या बोईंग कंपनीने या विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना आणि समुदायांना 10 कोटी डॉलर्स (सुमारे 689 कोटी रुपये) देण्याची घोषणा केली आहे. 
 
 
दरम्यान, ही रक्कम पुढील वर्षांसाठी प्राथमिक स्वरूपाची असेल. त्याबरोबरच इथिओपियन एअरलाईन्स आणि लायन एअरद्वारे चालवण्यात येणार्‍या 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातांमुळे प्रभावित क्षेत्रातील लोकांच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थानिक सरकारे आणि स्वयंसेवी संघटनांसोबत काम करण्यात येईल, असेही बोईंग कंपनीने सांगितले.
 
या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी बोईंग कंपनीवर खटला दाखल केलेला आहे. गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी लायन एअरचे 610 बोईंग 737 विमान इंडोनेशियातील जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर 13 मिनिटांनंतर अपघातग‘स्त झाले होते. यात 189 जणांचा मृत्यू झाला होता.
 
तसेच यावर्षी 10 मार्च रोजी इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला होता. यात 157 जणांचा मृत्यू झाला होता.