हज यात्रेवरून परतलेल्या दोघांची लाहोर विमानतळावर हत्या

    दिनांक :04-Jul-2019
लाहोर,
हज यात्रेवरून लाहोर विमानतळावर परतलेल्या दोन जणांची विमानतळावरच गोळ्याघालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज येथे घडल्याने या विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये या गोळीबाराने मोठीच घबराट उडाली आणि त्यातून त्यांची मोठी पळापळ झाली. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना विमानतळावरच अटक केली आहे. अर्षद आणि शान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी वैयक्तीक दुष्मनीतून या दोन जणांची हत्या केली आहे. 

 
हज यात्रेवरून आलेले दोन जण विमानतळाच्या मुख्य इमारतीतून बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर या गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर विमानतळाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था लगेच कार्यरत करण्यात आली. त्यांनी विमानतळाचे सर्व एन्ट्री पॉईन्ट्‌स त्वरीत बंद केले आणि हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यावेळी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.