ट्रम्प यांचे व्यंगचित्र काढल्याने त्याने गमावली नौकरी

    दिनांक :04-Jul-2019
ओटावा,
अमेरिका-मेक्‍सिको यांच्यातील सीमा वादाबाबत काढलेल्या एका व्यंगचित्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्याने एका व्यंगचित्रकाराला नोकरी गमवावी लागली आहे. कॅनडातील या व्यंगचित्रकाराचे नाव आहे मायकल डी एडर. या प्रकारानंतर सर्वच दैनिकांनी त्यांची सेवा घेण्याचे बंद केले आहे. मात्र एडर तसेच तो जिथे कंत्राटी पद्धतीवर काम करतो त्या ब्रुन्सविक न्यूज कंपनीने हे वृत्त फेटाळले आहे. 

 
गेल्या बुधवारी हे व्यंगचित्र व्हायरल झाले होते. त्याने काढलेल्या व्यंगचित्रामध्ये समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेला अल साल्वादोर येथील विस्थापित पिता आणि त्याची 23 महिन्यांची मुलगी यांचे विदारक मृतदेह दाखवले असून तिथे गोल्फ खेळण्यासाठी आलेले ट्रम्प या मृतदेहांना विचारत आहेत, ‘मी या ठिकाणी खेळलो तर तुमची काही हरकत आहे का?’ हे व्यंगचित्र व्हायरल झाले आहे. त्यावरुन व्यंगचित्रावर आणि एडर यांच्यावरही बरीच टिका झाली होती.