जाणून घ्या उपांत्य फेरीची समीकरणे

    दिनांक :04-Jul-2019
साऊथहॅम्पटन,
विश्वचषकाची प्राथमिक फेरी अंतिम टप्प्यात आली असून उपांत्य फेरीत जाणाऱ्या चार संघांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. प्राथमिक फेरीचे अजून काही सामने शिल्लक असून या सामन्यांचे निकाल लागल्यावर उपांत्य फेरीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.
 
यंदाच्या विश्वचषकात दहा संघ सहभागी झाले होते. हा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आला असून या दहा संघातील चारच संघ उपांत्य फेरीत तर दोन संघ अंतिम फेरीत धडकणार आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित झाली आहे. तर चौथा संघ न्यूझिलंडचा असण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानने बांगलादेश वर्ल्ड रेकॉर्ड करत हरवलं तर आणि तरच पाकिस्तान उपांत्य फेरी गाठेल.
पण तसे होण्याची चिन्हं धुसर आहेत. त्यामुळे हे चार संघ उपांत्य फेरीत भिडू शकतात. वर्ल्डकपच्या फॉरमॅटनुसार उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी लढतो. सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या, भारत दुसऱ्या तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकाविरोधातील सामना भारत जिंकल्यास भारत पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर येईल. तसं झाल्यास भारत उपांत्य फेरीत न्यूझिलंडशी लढण्याची दाट शक्यता आहे.
तसेच भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये अंतिम फेरी खेळली जाईल असं भाकीत काही क्रिकेटतज्ञांनी आधीच वर्तवलं आहे. जर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर भारताला परत एकदा इंग्लंडचा सामना करावा लागेल. तेव्हा उपांत्य फेरीत भारताचा टिकाव लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.