‘तो’ पावसासोबत निघून गेला!

    दिनांक :04-Jul-2019
दीपक वानखेडे 
 
आयुष्यभर ‘तो’ मातीत राबला. एकुलत्या एका पोराला शिकवून साहेब केला. आता पोराचा शहरात मोठा बंगला!
एक दिवस पोरगा शहरातून आला, त्याला म्हणाला-
‘‘माझ्यासोबत शहरात चला, ही जमीन विकून टाका!’’
साधाभोळा बाप तो! जमीन विकून टाकली. मोठी रक्कम पोराच्या खात्यावर जमा! त्याला वाईट वाटलं. हे गाव, त्याचं शेत आणि त्याच्या शेतातील पाऊस त्याच्या जिवापाड. पण मुलासमोर पर्याय नव्हता.
गाव सोडताना त्याला धरून सारं गाव रडलं, म्हणालं-
‘‘कायले जाता जी सयरात ? इथंच रावा लेकाले, आमी करू तुमचं, तुमी काय परके आहा आमाले? सयरात पोरगं कुठी लक्ष ठेवीन तुमच्यावर, हाये सुनवायरी तं, थे कुठी होते आपली, थेतं शेवटी परकीच हाये...’’
पण त्यानं नाही ऐकलं, कारण शेवटी पोरगं हक्काचं. ज्या दिवशी तो गावातून शहरात नेहमीसाठी येत होता. पाऊस वेगानं कोसळत होता. हे ओलं हिरवं रान त्यानं त्या दिवशी शेवटचं पाहिलं. आजवर प्राणप्रिय असणार्‍या या शेतकर्‍याला जिवाभावाचा पाऊसही येथेच राहा, असं सांगत होता जणू! तो पोराच्या बंगल्यात शहरात आला. 
 
 
मुलानं त्याला बंगल्यामागील रद्दी सामान ठेवण्याची खोली दिली. इथं जसा तो दुसर्‍या ग्रहावरचा विचित्र प्राणी!
कुणी त्याच्याशी बोलेना, एखादा त्याच्याशी बोललाच तर ‘‘हाय ग्रॅण्डपा’’ म्हणे, तर त्याला समजेना...
मग त्याला आठवण आली गावाची, शेताची, माणसांची... आणि त्याच्या पावसाची. तसं काही शोधण्यासाठी तो निघाला डांबरी रस्त्याने आणि एका कारने त्याला मागून ठोकलं.
तो पेशंट झाला नि त्याचा एक पाय बांधून, लटकवून!
त्याचं करण्यासाठी मुलानं एक पगारी नोकर ठेवला. त्याच्या वाट्याला नरकयातना आल्या!
त्यात एक दिवस त्याची सून म्हणाली,
‘‘कबतक पैर लटकाके पडे रहोगे? जल्दी मरते क्यों नही?’’
त्यानं हाय खाल्ली... अन्नपाणी सोडलं.
अशातच तीन दिवस झाले. तो पूर्णपणे एकाकी पडला. त्याला कुणाची तरी सोबत हवी होती. आणि तितक्यात त्या उघड्या खिडक्यांतून पाऊस त्याला भेटायला आला. त्या पावसात तो हरवला. त्याच्या डोळ्यासमोर ते माळरान, ते शेत आणि त्याचा आवडता पाऊस.... तो गावात, त्या दिवसांत हरवला. सारं दु:ख विसरून सुखावला. ‘‘मला तू सोबत घेऊन चल’’ तो पावसाला विनवणी करू लागला. पाऊस त्याचा मित्र होता, सखा होता, जिवलग होता.
मुलाला वेळ मिळाला तेव्हा मुलगा त्याच्या खोलीत त्याला पाहायला गेला, तेव्हा तो मेलेला आढळला, कदाचित एकदिवसापूर्वी त्याचे प्राण पाखरू पावसासोबत मुक्त होऊन निघून गेले होते.
मुलानं कर्तव्य म्हणून त्याच्या मृत्यूची बातमी गावाला दिली, कुणी उगाच येऊ नये म्हणून मरण आठ दिवसांपूर्वीच झालं असंही सांगितलं. गाव पुन्हा रडलं, हळहळलं.
इकडे बंगल्यासमोर एक मॅटेडोर उभा राहिला.
दोन नोकरानी त्याचे हातपाय धरून त्याला मॅटेडोरमध्ये स्मशानात नेण्याकरिता टाकलं.
कुणाचं तसं काही लक्ष नव्हतं, पण तिसर्‍या बंगल्यातील एक बाई हे दृश्य पाहत होती. तेवढ्यात एक मोलकरीणही तिथे आली, त्या बाईजवळ उभी राहिली, पाहत मोलकरीणनं त्या बाईला विचारलं,
‘‘कौन मर गया?’’
बाईनं उत्तर दिलं,
‘‘अरे वो अपने अजित साहब है नं, उनके बुढ्ढे फादर है, पैर तुट गया था उनका, बिमार थे. सुना है, बारीश जोरोसे आयी, तो और बिमार हो गये. अच्छे थे. चले गये बेचारे...