चिंब भिजवणारा पाऊस!

    दिनांक :04-Jul-2019
सर्वेश फडणवीस 
 
खूप दिवसांनी पुण्यात छान पाऊस अनुभवला. गर्मी आणि उन्हाळा चार महिने सहन केल्यानंतर त्याच्या येणाच्या चाहुलीने प्रत्येक जण जो आनंद अनुभवतो त्याची गोष्टच वेगळी आहे. गोष्ट नाही म्हणता येणार... पण मला जे काही वाटलं ते लिहितो आहे.
 
 
 
अचानक संध्याकाळी ढग दाटून आले होते. दिवसभर ते वातावरण मनावर दाटलेलं होतं. घरात एरवी कोणी नसताना सहसा कंटाळा येत नाही, पण काल खरच खूप उदास वाटत होतं सगळेजण त्याची चातकासारखी वाट बघत होते आणि थोड्याच वेळात तो आला... सगळ्यांचा जीवलग असा मित्र प्रत्येकाच्या मनात एक वेगळं घर केलेला असा पाऊस... तो आला ते मी आलोय्‌, मी आलोय्‌ अशी ढगांची गर्जना करतच आला आणि शेवटी बराच वेळ बाल्कनीतून बघताना हातात धरलेलं पुस्तक खाली ठेवलं आणि बाहेर गेलो आणि पाऊस आनंदाने मनमुराद बरसत होता. त्याच्या सरी अंगणातल्या झाडांना तृप्त करत होत्या. अर्थात झाडांवर जो हिरवेगार आणि टवटवीत पणा बघताना प्रत्येक मानवी मनाला आनंद होतो तर त्यांना किती आनंद होत असेल हे त्यांच्या हालचालीने समजत होते कारण तो आल्याचा आनंद त्यांना ही झाला होता आणि रोज अशी संधी त्यांना ही कुठे मिळते .
 
खूप दिवसांनी असा मस्त पाऊस पडताना आज इतकं निवांत बघता येत होतं. नुकतीच नवी शाळा सुरू झालेली... शाळकरी मुले छान सायकलवर भिजत चाललेली बघत होतो. आपणही शाळेत असंच भिजायचो, हे आठवून मनातच हसायला आलं. त्या त्या वयाची ती ती मजा असतेच. तेव्हा आईने हजार वेळा सांगूनही मुद्दाम रेनकोट विसरून शाळेला जाताना बर्‍याच जणांना आठवेल आणि मग संध्याकाळी भिजून आल्यावर आई रागवायची आणि भिजून आल्यामुळे नंतर छान गरमागरम चहाही करून द्यायची आणि त्या चहानं पावसाचा गारवा कुठल्या कुठे पळून जायचा, एकदम एका क्षणात सारं आठवलं आणि आठवणीत रमताना काही प्रसंग कायमच साठवणीत असतात. खूप दिवसांनी झाडांच्या पानांवरून पाण्याचे चिमुकले थेंब पडताना पाहिले आणि झाडाच्या पानावर ऐटीत बसलेले पाण्याचे थेंब जणू काही मोतीच असल्याचा भास होत होता म्हणूनच मोत्यांना ‘पाणीदार’ म्हणत असतील असे वाटले.
 
ते दिवस आणि आजचे दिवस यात नक्कीच फरक पडला आहे. आज मस्त पाऊस पडला की टपरीचा चहा भजी,आणि गरमागरम भुट्टे आणि मित्राच्या गाडीवर बसून फिरायला जाणं हे आम्हा तरुणांचे पावसाळी आला की ओघाने नेहमीच करायचे ठरवलेलं असल्यामुळे सगळेजण त्याची वाट बघतच असतात. आम्ही तरुण पावसात हीच मजा करत असतो. त्यात वेगळीच मजा आहे . छान गाडीत बसून मेघ मल्हार राग ऐकत कुठंतरी दूरवर जाताना पण एक वेगळाच आणि विलक्षण आनंदाची अनुभूती आपण घेऊ शकतो. पावसाचा आणि मानवी भावनांचा अतिशय निकटचा संबंध आहे. भावना उत्कटपणे व्यक्त करण्याचं कदाचित पाऊस हे केवळ माध्यम असावं. पण पाऊस,पावसाळ्यात करायचा ट्रेक,भटकंती,किल्ल्यावर जाण्याची मजा ही अनुभवताना पाऊस हा सोबतीला असतानाची मजा वेगळीच आहे.
 
निसर्गाच्या या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी बाहेर पडायलाच हवं, तेव्हाच हे आपण अनुभवू शकतो. निसर्ग माणसाला नेहमी खुणावत असतो मानवी मनाला कवेत घेण्यासाठी तो तत्पर असतो चला तर मग आपल्या आप्तस्वकीय, जीवलग आणि मित्र मैत्रिणींच्या सानिध्यात हा िंचब भिजवणार्‍या पावसाचा आनंद घेऊ या. आनंद वाटून घेण्याची मज्जाच वेगळी असते. नात्यातला प्रत्येक ऋणानुबंध या पावसात अधिक आनंद उत्साह आणि आल्हाददायक असेल हीच सदिच्छा!