काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?

    दिनांक :04-Jul-2019
दिल्ली वार्तापत्र 
शामकांत जहागीरदार  
 
काँग्रेस पक्षात आतापर्यंत जे काही सुरू होते, त्याचे वर्णन ‘तमाशा’ या शब्दातच करावे लागेल! राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होते, तर अन्य काँग्रेस नेते त्यांनी राजीनामा मागे घ्यावा या भूमिकेवर. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम असतानाच राहुल गांधी यांनी एक घोषणा केली. मी आता पक्षाचा अध्यक्ष नाही. त्यांनी चार पानी पत्रच प्रसिद्धीसाठी पाठवून आपण राजीमाना मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
 
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यसमितीने हा राजीनामा फेटाळून लावत, सर्व पातळ्यांवर व्यापक संघटनात्मक फेरबदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना दिले होते. मात्र, राहुल गांधी आपला राजीनामा मागे घ्यायला तयार नव्हते. तसेच अध्यक्षपदाची सूत्रेही पूर्णपणे सोडत नव्हते, त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे ठप्प झाला होता. 

 
 
निवडणुकीतील जयपराजय हे चालतच असतात. निवडणुकीतील पराभवामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एवढे खचायचे नसते, जेवढे राहुल गांधी दाखवत आहेत. कोणत्याही पराभवानंतर आत्मपरीक्षण करून नव्या उत्साहाने कामाला लागायचे असते. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा आकाशात झेप घ्यायची असते. कोणताही विजय हा जसा अंतिम नसतो, तसाच कोणताही पराभव हा अंतिम नसतो. पण, याचे भान राहुल गांधी यांना राहिले नाही. आपल्या कृतीने त्यांनी स्वत:चे आणि पक्षाचेही अपरिमित नुकसान करून टाकले आहे. राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षासाठी असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती राजीनाम्यानंतरही कायमच आहे.
 
अध्यक्ष म्हणून पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी राजीनामा देणे योग्य होते. पण, पक्षाच्या कार्य समितीने राजीनामा फेटाळल्यानंतर अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते. पराभवामुळे नीतिधैर्य गमावून बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्यावर होती. पण, राहुल गांधी स्वत:च आत्मविश्वास गमावून बसल्याचे दिसत होते. जे एका नेत्याला मुळीच शोभणारे नव्हते.
 
1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या, त्याचे दु:ख तेव्हा पक्षाचे नेतृत्व करणारे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना झाले नसेल असे नाही. मात्र, त्या वेळी या दोन्ही नेत्यांनी आत्मविश्वास गमावला नाही तसेच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वार्‍यावरही सोडले नाही. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हा एक ओळीचा अटलजींचा मंत्रच नंतर या पक्षाला उंचीवर घेऊन गेला.
 
एखाद्या गोष्टीचे दु:ख किती करायचे याच्या काही मर्यादा असतात. दोन लहान मुलं असणार्‍या एखाद्या महिलेच्या पतीचा कोणत्याही कारणाने मृत्यू होतो, तेव्हा त्या महिलेवर आकाश कोसळले असते. पण, आपले आभाळाएवढे दु:ख गिळून ती महिला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी डोळ्यांतील अश्रू पुसून पुन्हा कामाला लागते. राहुल गांधींचे दु:ख तर तेवढे खचीतच नाही.
 
त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या जागा मिळाल्या नसल्या, तरी 52 जागा मिळाल्या आहेत. याचा उपयोग करत विरोधी पक्ष म्हणून लोकसभेत जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याऐवजी काँग्रेस पक्ष हतबल झाल्याचे दिसत आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे सदस्य एखाद्या शोकसभेत बसल्यासारखे चेहरे करून असतात.
 
राहुल गांधींना एकीकडे अध्यक्षपदावर राहायचे नाही आणि दुसरीकडे अध्यक्षपदाची सूत्रेही सोडायची नाहीत, अशी विरोधाभासी स्थिती निर्माण झाली होती. कारण, छत्तीसगडचा प्रदेशाध्यक्ष बदलला गेला तेव्हा त्याला कुणी बदलविले, असा प्रश्न त्यावेळी पडला होता. एकीकडे ते काँग्रेस नेत्यांच्या बैठकीही घेत होते, दुसरीकडे आपण अध्यक्षपद सोडण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही सांगत होते. राहुल गांधींनी नुकतीच, विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. राहुल गांधी जर आता काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत तर त्यांनी ही बैठक कोणत्या अधिकारात घेतली, असा प्रश्न पडतो. पण, आता स्थिती स्पष्ट झाली आहे. गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष कार्यसमितीने नेमावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
 
निर्णय न घेणे हाच कधीकधी निर्णय असतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. काँग्रेस पक्षातील आजची स्थिती पाहिल्यानंतर त्याची आठवण येते. राहुल गांधींना पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षातील दुसर्‍या फळीतील नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, पण ज्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे, असे राहुल गांधींना मनापासून वाटते, त्यांनी अद्याप राजीनामे दिले नाहीत.
 
मुळात हा प्रश्न लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा नाही, तर काँग्रेस पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्षाचा आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसपक्षातील ज्येष्ठ नेत्यांमधील हा संघर्ष आहे. राहुल गांधींचे नेतृत्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनापासून स्वीकारले नसल्याचे हे द्योतक आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभवामागचे मुख्य कारण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना न केलेले सहकार्य आहे.
 
काँग्रेस जिंकली पाहिजे, या दृष्टीने पक्षाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने काम केले नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राज्यातील अन्य मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांना वार्‍यावर सोडत आपल्याच मुलाच्या मतदारसंघात तळ ठोकून होते. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती देशाच्या सर्व भागात होती. त्याचा राग राहुल गांधींच्या मनात आहे.
 
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत याबाबतच्या तीव्र भावना राहुल गांधी आणि श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच तेव्हा राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षात वादळ येईल, अन्य सर्व नेतेही राजीनामे देतील, असे अपेक्षित होते. पण तसे काही झाले नाही. राहुल गांधींच्या राजीनाम्याचे कोणतीही तीव्र पडसाद पक्षात उमटले नाहीत.
 
राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास सवा महिन्याने काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांची भेट घेत राजीनामा मागे घेण्याची विनंती करतात, पण, स्वत: राजीनामा देत नाहीत यातच सर्वकाही आले. राहुल गांधींच्या निवासस्थानासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणे दिले, उपोषण केले मात्र त्यात कुठेच उत्स्फूर्तता दिसली नाही.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससमुक्त भारताची गोष्ट करत होते, पण ती काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते इतकी मनावर घेतील, असे वाटले नव्हते. मुळात काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याने करायचे की घराण्याबाहेरच्या व्यक्तीने, याबाबतचा अधिकार काँग्रेस पक्षालाच होता आणि आहे. आता याबाबतचा निर्णय पक्षाने लवकर घेतला पाहिजे. कारण लोकशाहीव्यवस्थेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे, जगला पाहिजे. व्यापक हितासाठी तसेच जनतेच्या कल्याणासाठी विरोधी पक्षाचा सरकारवर अंकुश असला पाहिजे.
 
जोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गांधी घराण्याचे नेतृत्व मान्य आहे, तोपर्यंत कुणी त्यापासून गांधी घराण्याला रोखू शकणार नव्हतेच. आता राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा ठोस निर्णय झाल्यानंतर पक्षनेतृत्वाला अन्य व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपविण्याचे सोपस्कार तातडीने पार पाडायला हवे. असे समजते की, संपूर्ण देशाला मान्य होणारे नेतृत्व कोणते असू शकते, यावर शोध सुरू होता. एखादे नाव समोर आले की, त्यावर एकमत होत नव्हते. आतातरी ज्येष्ठ नेत्यांनी गांधी घराण्याबाहेरच्या दुसर्‍या सक्षम नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवावी, मात्र नेतृत्वाचे भिजतघोंगडे ठेवू नये.
 
मात्र, एकदा पक्षाचे नेतृत्व घराण्याबाहेरच्या दुसर्‍या नेत्याकडे सोपवले तर त्यात राहुल-सोनियांनी हस्तक्षेप करू नये, नव्या अध्यक्षाला कळसूत्री बाहुला बनवण्याचे स्वप्न पाहू नये. त्याला स्वतंत्रपणे काम करू द्यावे. तसेही राहुल गांधी हे काँग्रेसचे गांधी घराण्यातील शेवटचेच नेतृत्व आहे. राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी नव्या अध्यक्षाबाबतच्या निर्णयावर जेवढ्या लवकर शिक्कामोर्तब करतील, तेवढे ते काँग्रेस पक्षाच्या आणि त्यांच्याही हिताचे राहील.