कुख्यात लकी खानवर प्रतिस्पर्धी गुंडांचा गोळीबार

    दिनांक :04-Jul-2019
-कोराडी रोडवर खळबळ
-लकी गंभीर जखमी
 
नागपूर: कुख्यात गुंड नदीम गुलाम ऊर्फ लक्की गुलाम नवी शेख ऊर्फ लकी खान (वेलकम सोसायटी मॉडर्न शाळेजवळ, भोकारा) याच्यावर चारचाकी वाहनातून आलेल्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी गोळीबार केल्याने गुन्हे वर्तुळात खळबळ उडाली आह. मंगळवारी मध्यरात्री पावणेबारा वाजताच्या सुमारास कोराडी रोडवरील कल्पना टॉकिज परिसरातही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकी एका प्रकरणात आरोपी असून यासंबंधी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी साथीदारासह तो चर्चा करण्यासाठी गेला होता. ते काम आटोपून कस्तुरचंद पार्कजवळ तो कुणासोबत बोलला. तेथून तो त्याच्या घरी जाण्यास चारचाकी वाहनातून निघाला. कोराडी रोडवरील कल्पना टॉकिजजवळून तो जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या गुंडांनी त्याला ओव्हरटेक केले आणि लकीच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यामुळे लकीला थांबावे लागले. दुसऱ्या  वाहनातून दहा-बारा जणांचे टोळके उतरले. त्यापैकी एकाने लकीच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी लकीच्या उजव्या दंडावर लागल्याने लकी गंभीर जखमी झाला. गोळीबार करून गुंडांचे टोळके लगेचच आलेल्या वाहनात बसले आणि सुसाट वेगाने पळून गेले.मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजाने तेथे थरार निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पथकही तेथे आले. लकी खानला अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले असता आरोपींनी देशी काट्यातून दोन गोळ्या झाडल्याच प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शस्त्र नेमके हेच होते काय, ते कुठून आणले, वगैरे हल्लेखोरांच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. लकीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा आरोपी व त्याच्या ४-५ साथीदारांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी घटनाची चौकशी सुरू केली. पोलिसांना यातील आरोपींची नावे समजली. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. लकीकडून आरोपींनी ३ लाख रुपये घेणे होते व यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. आरोपींनी लकीकडे या रकमेबद्दल तगादा लावला होता. पण, लकी त्यांना दाद देत नव्हता. त्यातून आरोपी संतापले होते, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात मांडवलीचा प्रमुख मानला जाणारा सुभाष शाहू याची काही वर्षांपूर्वी प्रसादातून सायनार्ईड खाऊ घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात गुन्हे शाखेने लकीला अटक केली होती. तेव्हापासून तो गुन्हेगारी जगतात आणि पोलिसांच्याही रेकॉर्डवर आला होता. त्याच्यावर मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने गुन्हे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांमधील टोळी युद्ध उफाळून आले आहे. गुन्हेगारांमधील वैमनस्य उफाळून आले असून या घटना बघता टोळी युद्ध वाढणार की काय, या शंकेला पेव फुटले आहे.