लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा

    दिनांक :04-Jul-2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत निवडणुकीनंतरचे सूर बिघडत चालले आहे. संघटनेतील पदाधिकारी असलेले लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका वंचित आघाडीला बसू शकतो.

 
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत टीका केली. तर या टिकेला उत्तर देताना पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. 
माने म्हणाले, पूर्वी संघाशी आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीत महासचिवपद देण्यात आले आहे. यावर माने यांनी आक्षेप घेतला असून आम्ही आघाडी उभारण्यात मेहनत घेतली मात्र, आता हे आयत्या बिळावर नागोबा झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकारामुळे वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.