महिलांनी पकडली लाखोंची दारू

    दिनांक :04-Jul-2019
मुरुमगाव येथील गाव संघटनेच्या महीलांनी पकडली लाखो रुपयाची दारु !
 

 
 
मुरुमगाव: हे गाव गडचिरोली जिल्ह्यात येत असल्याने येथे दारूबंदी आहे . गावात मुक्तीपथकाचे  गावसंघटन स्थापन झाले असुन महीला दररोज गावात दारुविक्रेत्यांवर लक्ष ठेवत असतात. तरी देखील गावातून दारुचा पुरवठा होतो, हे लक्षात आल्यावर महीलांनी दारुची पाळेमुळे शोधन्याचे ठरवले. त्यानुसार बुधवारी रात्री एक पांढरी पीक अप गाडी महिलांना संशयास्पद वाटली. महीलांनी त्या गाडीचा पाठलाग सुरु केला. महीला आल्याचे लक्षात येताच त्याने गाडी सुसाट वेगाने जवळच्या रीडवाही उमरपालच्या जंगलाच्या दिशेने पळवली. महीलांनी भर पावसात त्या गाडीचा पाठलाग केला व त्या ठिकाणी महीलांना पाहताच ती गाडी तेथेच ठेऊन काही लोक दुसऱ्या एका गाडीतून पळाले. गाडी जवळच महीलांना दारुने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आढळली. महीलांनी रात्रभर या दारुला पहारा दिला. व सकाळी सदर घटनेची माहीती पोलिसांना दिली. महीलांनी वाढत्या पावसामुळे पहाटे घरी जाऊन पुन्हा यायचे ठरवले. त्या घरी गेल्या व काही वेळाने त्यांनी पुन्हा येउन पाहीले असता त्यातील दारु पिक अप वाहणाने दुसरीकडे नेली जात होती. नाल्यावर असलेल्या गुडघाभर पाण्यातून महीलांनी गाडी पकडली. त्यामध्ये असलेला व्यंकटेश बहीरवार महिलांना सोडून देण्याची विनंती करीत होता. महीलांनी नकार दिल्याने त्याने महीलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करीत तो तेथुन पसार झाला. मुरुमगाव पोलिस मदत केंद्राने सदर ठिकाणावर पकड्लेल्या दारु व वाहणाचा पंचनामा केला. यामध्ये रोमीओ लिहीलेल्या 2730 दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. सरपंच प्रियांका कुंजाम, सायरा शेख, प्रतिभा उइके, अविका आचला, नीरजा कुंजाम, आसोबाई पिद्दा, अनारबाई पिद्दा, लिलाबाई भुरकुरीया, बुधाबाई भोयर, पुष्पाबाई कारेवार, शहीदा पठाण, मुनीर शेख, संगीता पोया यांसह मुक्तिपथ गावसंघटनेच्या महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. पकडलेल्या दारूची किंमत लाखोंच्या घरात आहे.