भक्तांसाठी विठुरायाच्या मंदिराचे दार आजपासून २४ तास खुले

    दिनांक :04-Jul-2019
पंढरपूर: शेकडो किलोमीटरची पायी वारी करीत लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी एकादशीच्या निमित्याने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून विठुरायाच्या २४ तास दर्शनाला सुरुवात झाली आहे . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले असून देवाचा शेजघरातील पलंग देखील काढण्यात आला आहे. 

 
आजपासून विठुरायाचे VIP व ऑनलाईन दर्शन यात्रा संपेपर्यंत बंद करण्यात आल्याचे संस्थानातर्फे सांगितले असून यामुळे आता फक्त दर्शन रांगेत तासंतास उभ्या राहणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता येणार आहे . आजपासून रोज जवळपास ५० ते ६० हजार भाविकांना देवाच्या पायावर दर्शन घेता येणार असून रोज लाखभर लोकांना मुखदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
आज देवाच्या महानैवेद्यानंतर देवाचा शेजघरातील पलंग काढण्यात येऊन देवाच्या पाठीमागे कापसाचा लोड बसविण्यात आला. आजपासून विठुरायाच्या काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचे सर्व राजोपचार बंद होणार असून सकाळी नैवेद्य , सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार देवाला केले जाणार आहेत. आज देवाचा आणि रुक्मिणी मातेचा पलंग काढल्यामुळे आषाढी यात्रेचा सोहळा संपेपर्यंत देव चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी उभा राहणार आहे.
परंपरेनुसार, सातत्याने उभा राहून देवाला थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीला कापसाचा लोड बसविण्यात आला असून रुक्मिणी मातेच्या मागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. यामुळे आता भाविकांना आजपासून रात्रंदिवस विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता येणार असून मंदिर समितीने आजपासून ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केलेली आहे.