'तारक मेहता'मध्ये नवीन 'दयाबेन'

    दिनांक :04-Jul-2019
मुंबई,
प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिका सोडणार असल्याचं नक्की झालं आहे. गेल्या वर्षभरापासून 'दयाबेन' मालिकेतून गायब होती. ती पुन्हा मालिकेत दिसणार की नाही? याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. परंतू वर्ष झालं तरी दिशानं मालिकेत काम करण्यासंदर्भात कोणताही निर्णय सांगितला नाही. त्यामुळं दिशाची जागा आता नवीन अभिनेत्री घेणार आहे. नवीन दयाबेन म्हणून 'बडे अच्छे हैं' आणि 'हमने ली शपथ' फेम अभिनेत्री 'विभूती शर्मा' हीची निवड झाल्याची चांगलीच चर्चा आहे. असं असलं तरी निर्मात्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

 
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिशाला मुलगी झाली. बाळंतपणाच्या रजेवरून ती अद्याप परतलेली नाही. तिला सध्या तिच्या मुलीकडं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळं तिनं मालिकेला कायमचा रामराम ठोकला असल्याचं म्हटलं जात आहे. तिची भूमिका मालिकेत महत्त्वाची होती, त्यामुळं 'दयाबेन'च्या अनुपस्थितीत मालिकेचा टीआरपी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र मालिकेचा टीआरपी कायम राहिला.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका २००८ मध्ये सुरू झाली. मालिकेच्या सुरुवातीपासून दिशा 'जेठालाल'च्या पत्नीची - दयाबेनची भूमिका साकारत आहे. तिच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळं ती अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.