Budget 2019: २० रुपयांचे नाणे लवकरच येणार चलनात

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी नवीन नाणी चलनात येणार असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे सध्या चलनात असणाऱ्या नाण्यांबरोबर पहिल्यांदाच २० रुपयाचे नाणे चलनात येणार असल्याची माहिती सीतारमन यांनी संसदेमध्ये दिली.

‘लवकरच नवीन नाणी चलनात येणार आहेत. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपयांच्या नाण्याबरोबरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार आहे,’ असं सितारमन यांनी सांगितले. ‘ही नवीन नाणी अंधांना ओळखता येतील अशाप्रकारचे त्यांची निर्मिती केली जाणार आहे’ असंही सितारमन यांनी सांगितले.
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी ७ मार्च रोजी या नव्या नाण्यांचे अनावरण केले. अंध आणि दिव्यांगांना ही नाणी ओळखता यावी म्हणून नाण्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यामुळे त्यांना ही नाणी ओळखणे अधिक सोपे जाणार आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने चलनातील ५०० तसेच १००० रुपयांच्या नोटा हद्दपार केला. काळ्या पैश्याविरोधात कारवाई म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारने जाहीर केले होते. नोटबंदीच्या निर्णयानंतर बाराजामध्ये ५०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यापाठोपाठ २०१७ साली ५० रुपयांच्या आणि १०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये दहा रुपयांच्या नवीन नोटा चलानात आणण्यात आल्या. त्याचप्रमाणे लवकरच २० रुपयांच्या नवीन नोटा मोठ्या प्रमाणात नोटा चलनात आणणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे. याच घोषणेपाठोपाठ आता अर्थमंत्र्यांनी नवीन नाणी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. २०१९ पासून १० रुपयांची नाणीही चलनात आणण्यात आली असून १ रुपये तसेच २ रुपये मुल्याच्या नाणी मागील काही वर्षांमध्येच नव्याने चलनात आणण्यात आली आहेत.