CWC2019: टीम इंडिया कोणाशी भिडणार; इंग्लंड की न्यूझीलंड?

    दिनांक :05-Jul-2019
लॉर्ड्स,
पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगल्यानंतर यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड हे चार संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत राहिले आहेत. पण उपांत्य फेरीत कोण कोणाशी भिडेल याचे चित्र शनिवारी स्पष्ट होईल. सद्य परिस्थितीनुसार भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असेल असे दिसत असले तरी यात उलटफेर होऊ शकतो. 

 
शनिवारी साखळी फेरीचे सर्व सामने संपतील. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. त्यापाठोपाठ भारतीय संघ असेल. भारताला अखेरच्या लढतीत श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि ही लढत जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल. पण, तशी शक्यता फार कमीच आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडने आपले स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.
 
आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार गुणतालिकेतील अव्वल संघ हा उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. त्यानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा पहिला उपांत्य सामना मँचेस्टर येथे होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे होईल. पण, जर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास आणि दुसरीकडे भारताने विजय मिळवल्यास ही क्रमवारी बदलेल. भारत अव्वल स्थानावर जाईल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यास. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड असे उपांत्य फेरीचे सामने होतील.