निर्देशांकाची ३९७ अंकांनी घसरण

    दिनांक :05-Jul-2019
मुंबई,
अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना 40 हजारांपर्यंत उसळी घेतलेला मुंबई शेअर बाजार शुक्रवारी 397 अंकांनी घसरून बंद झाला. सार्वजनिक समभाग धारणाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी करताच शेअर बाजारात घसरण झाली. या घोषणेमुळे बाजारातील तरलता कमी होण्याची भीती निर्माण झाल्याने सार्वजनिक समभाग धारणाची मर्यादा 25 टक्क्यांवरून वाढवून 35 टक्के करण्याची ही योग्य वेळ असल्याचे निर्मला सीतारामन्‌ यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सांगितले. 

 
 
त्यानंतर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि विक्रीचा दबाव वाढला. यामुळे निर्देशांक 394. 67 अंकांनी घसरून 39,513.39 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकाने 40,032.41 अंकांपर्यंत भरारी घेतली होती. निफ्टीमध्येही आज 135.60 अंकांनी घसरण झाली. निफ्टी 11.811 अंकांवर बंद झाला.
 
मुंबई शेअर बाजारात आजच्या व्यवहारादरम्यान एफएमसीजी, बँकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यस बँकेचे समभाग 8.36 टक्क्यांनी घसरले, तर एनटीपीसी, मिंहद्रा अॅण्ड मिंहद्रा, वेदांता, सन फार्मा आणि टीसीएस कंपन्यांचे समभाग 4.81 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे इंड्‌सइंड बँक, कोटक बँक, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये 2.16 टक्के वाढ झाली.