'ती'ची गुंतवणूक

    दिनांक :05-Jul-2019
अदिती कोठारी-देसाई
 
असं म्हणतात की, ‘आयुष्य ही एक गुंतवणूक आहे!’ आयुष्याच्या या गुंतवणुकीत अगदी गांभीर्यानं कुणी सहभागी होत असेल, तर ती स्त्री होय! काही ठिकाणी ती घराच्या आतच असली, तरी तिचं तिच्या या गुंतवणुकीवर बारीक लक्ष असतं. भावनिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक इत्यादी पातळीवर कधी जाणीवपूर्वक, तर कधी तिच्या नकळतही तिची गुंतवणूक तिच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, जोडीदारासाठी सतत सुरू असते. वर वर पाहिले तर बाहेरच्या लोकांना स्त्रीच्या या गुंतवणुकीबद्दल फारसं काही माहीत नसतं किंवा गुंतवणुकीसाठी ती खोलवर विचार करत असेल, हे कुणालाही पटणार नाही.
 
भटके जीवन जगणारा मानव स्थिरावला आणि समूहाने राहू लागला. टोळ्या स्थिरावल्या आणि मग त्यांची घरे, कसबे, वाड्या झाल्या. त्यावेळपासून किंवा त्या आधीच्या शिकारी अवस्थेपासूनच मिळविलेले जीवनद्रव्य राखून, सांभाळून ठेवण्याचे काम स्त्रीनेच केले आहे. शिकारी अवस्थेनंतर मानव शेती करू लागला. त्या वेळीही पुरुष शिकारीसारखी जोखमीची, अवजड कामेच करत आणि स्त्रियाच शेती करत. त्यासाठी बियाणे जोडून ठेवण्यापासून खते तयार करण्यापर्यंतची कामे तीच करत असे. याला गुंतवणूकच म्हणायला हवे. बदलत्या काळात गुंतवणुकीचे संदर्भ बदलले. मुद्रविनिमय पद्धत आली आणि नंतर पैशातून पैसा वाढू लागला. बँका आल्या, पतपेढ्या आल्या... 
 
 
आता तर अनेक आयाम आलेत गुंतवणुकीला. मात्र, जुन्या काळात पैसा राखून ठेवण्याचे काम स्त्रीनेच केले आहे. अगदी अलीकडेही घरी फडताळात, मोहरीच्या डब्यात किंवा असल्याच कुठल्या जिकनीत घरची ज्येष्ठ स्त्री पैसा राखून ठेवत असे. महिन्याच्या अखेरीस घरचा पुरुष हमखास तिच्याकडेच हात पसरत असे आणि तीही त्याला निराश करत नसे. अगदी सणवाराच्या वेळी घरातल्या सदस्यांचा आनंद आणि उत्साह पैशापाशी अडू नये यासाठी ती जिनसांपासून पैशांपर्यंत अनेक गोष्टी राखून ठेवत असे... अशा अनेक हळव्या आठवणी आपल्या प्रत्येकाकडेच आहेत. म्हणजे दिवाळीच्या चार-सहा महिने आधीपासून घरच्या वाणसामानात साखर, तूप, शेंगदाणे, सुकामेवा असे पदार्थ जरा जास्तच मागविले जात आहेत, हे कुणाच्या लक्षातही येत नसे आणि दिवाळीच्या वेळी या जिनसांची टंचाई असली किंवा भाववाढ झाली असली नि घरच्या पुरुषाजवळ सणांसाठी जादा निधी नसला की घरची स्त्री म्हणायची, ‘‘काळजी नको, आहे आपल्याकडे सारेच...’’ हे ती गेल्या चार-सहा महिन्यांपासून राखून ठेवत असे.
 
तशी घरच्या स्त्रीची गुंतवणूक ही तिचे कुटुंबीयच असते. मुलं, नवरा, सासू-सासरे... असेच. आज ती कमावती झाली आहे. तिचेही बँकेत खाते असते. तरीही तिची गुंतवणूक म्हणजे तिचे कुटुंबच असते.
 
आयुष्याच्या या सारिपाटावर या छोट्या छोट्या गुंतवणुकीची ही कला स्त्री लहानपणापासूनच आत्मसात करीत असते. घरात असणार्‍या आई-वडिलांपासून ती बरेच काही तिच्या शाळेच्या दिवसांत शिकत असते. घराला, भावंडांना कोणतीही अडचण जाऊ नये म्हणून आई-बाबा किती काटकसर करतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी छोट्या छोट्या गुंतवणुकी, पोटाला चिमटा घेऊन कशा करतात, हे प्रत्येक शाळकरी मुलीनं जवळून पाहिलं असतं आणि पुढे संसारात पडल्यावर तिला वठवाव्या लागणार्‍या भूमिकेची जबाबदारी ओळखून ती स्वत:ला त्याच दिवसांत सज्ज करीत असते. म्हणून कोणत्याही मुलीचं लग्न झालं की, लग्नात हाती आलेल्या पैशांपासून तिची पहिली संसाराची गुंतवणूक सुरू होते.
 
स्त्रियांच्या तुलनेत पुरुष हा गुंतवणूक नक्कीच अधिक करतो, पण ती पूर्णपणे आर्थिक असते. त्याला भावनिक जोड कमी असते. बारकाईने पाहिले तर पुरुषाच्या गुंतवणुकीला तसा अर्थही नसतो. याचं कारण म्हणजे एखाद्या माणसानं आर्थिक गुंतवणूक जरी मोठी केली आणि त्याला थोडं जरी काही काम आलं तर केलेली गुंतवणूक तो सोडवून घेतो आणि खर्च करून टाकतो. स्त्रियांच्या बाबतीत असं होत नाही. तिनं जी गुंतवणूक केली ती सहजासहजी तोडत नाही आणि नवर्‍यालाही ठेव मोडू देत नाही.
 
आजच्या घडीचा विचार केला तर पैशांना खूपच महत्त्व आलं आहे. घरदार आणि राहणीमान यात अमाप पैसा खर्च होतो. तुम्हाला एखादं छोटंसं घर बांधायचं असेल किंवा विकत घ्यायच असेल, तरी कर्ज काढून किंवा कुठूनतरी पैसा काढून घरकूल उभं करावं लागतं आणि अशा वेळी घरातील स्त्रीच कामी येते. भिसी, गट, किंवा इतर प्रकारे तिनं केलेली छोटी गुंतवणूक या वेळी मोठं काम करते. एक काळ होता की, जेव्हा स्त्रीचा आर्थिक गुंतवणुकीत तेवढा वाटा नव्हता. पण, हल्लीच्या काळात स्त्रीचा यातला वाटा आता मोठा होतोय्‌. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी किंवा कुठल्याही नोकरीला लागलेली मुलगी, तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायला लागली आहे आणि यावेळी ती तिच्या भविष्याचा विचार करायला लागली आहे.
 
आपलं लग्न आणि आपल्या भावंडांच्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या लग्नाचा विचार करता आपला हातभार महत्त्वाचा आहे, याची जाणीव तिला व्हायला लागली आहे. तिच्या या भूमिकेचा तिच्या वडिलांना आणि होणार्‍या नवर्‍यालाच अनायासे फायदा होत असतो. आज सुधारलेल्या समाजात जिथे स्त्री, पुरुषाच्या बरोबरीने सर्व जबाबदार्‍या पार पाडत आहे, तिथे पुरुषांच्या तुलनेत फक्त अर्ध्याच स्त्रिया त्यांचे स्वत:चे, स्वतंत्र गुंतवणुकीचे निर्णय घेतात, हीपण एक सत्यता आहे. कारण, आजही पुरुषप्रधान समजल्या जाणार्‍या समाजात स्त्रियांच्या गुंतवणुकीवर घरातील माणसं लक्ष ठेवून आहेत. स्त्रीने केलेली गुंतवणूक त्यांना तितकी आवडत नाही की काय, असे वाटते आहे. 33 टक्के स्त्रिया गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्रपणे घेतात आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण 64 टक्के आहे.
 
अधिकाधिक नवरे (40 टक्के) आपल्या पत्नीनं आपल्या बरोबरीनं गुंतवणूक करावी, किंवा तिला गुंतवणुकीचं महत्त्व लक्षात यावं म्हणून पत्नीला गुंतवणुकीची ओळख करून देतात; तर फक्त 27 टक्के वडील ही जबाबदारी पार पाडतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक प्रमाणात मुलांसाठीची लक्ष्ये गाठण्याचा प्रयत्न करतात. अनेक सहभागींच्या मते, मुले 20 वर्षांची होण्याआधीच त्यांना गुंतवणुकीविषयी शिकवायला हवे.
 
निल्सनच्या सहकार्याने 8 शहरांमध्ये 4000 हून अधिक सहभागींसह सर्वेक्षण केले. स्त्रिया आणि पुरुषांची गुंतवणुकीतील बांधिलकी आणि यासंदर्भातील सवयी, अशा गुंतवणूक वागणुकीवर या अहवालात भर देण्यात आला आहे. या सर्वेक्षणात 8 शहरांमधील 4,013 महिला आणि पुरुषांना सहभागी करून घेत पैशासंदर्भातील त्यांची लक्ष्ये आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
या सर्वेक्षणात मुंबई, दिल्ली कोलकाता, बंगळुरू या चार महानगरांचा आणि इंदोर, कोची, लुधियाना आणि गुवाहाटी या चार निमशहरी भागांचा समावेश करण्यात आला होता. 25 ते 60 या वयोगटातील, गुंतवणूक निर्णयप्रक्रियेत सहभागी होणारे 1853 पुरुष आणि 2160 महिलांचा यात सहभाग होता. जानेवारी ते फेब्रुवारी 2019 या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. सध्या काम करत असलेले किंवा ज्यांनी भूतकाळात किमान दोन वर्षे काम केले आहे, अशा एकट्या असणार्‍या, मुले नसलेले विवाहित, मुले असलेले विवाहित अशा व्यक्तींचा यात समावेश होता.
 
या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की, फक्त 33 टक्के स्त्रिया स्वतंत्रपणे गुंतवणुकीचे निर्णय घेतात, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 64 टक्के आहे. स्वतंत्रपणे गुंतवणुकीचे निर्णय घेणार्‍या स्त्रियांना मुख्यत: पतीकडून (33 टक्के) किंवा पालकांकडून (24 टक्के) हे प्रोत्साहन मिळाले होते. 13 टक्के महिलांनी सांगितले की, पतीचे निधन किंवा घटस्फोट झाल्याने त्यांना स्वत:च निर्णय घेणे भाग पडले. फक्त 30 टक्के महिलांनी स्वत:च्या गुंतवणुकीचे निर्णय घेतले, कारण त्यांना ते स्वत:च करायचे होते. या सर्वेक्षणातून हेही स्पष्ट झाले की, महिलांना गुंतवणुकीची ओळख करून देण्यात वडिलांच्या (27 टक्के) तुलनेत पतीचा (40 टक्के) अधिक वाटा आहे; तर दुसर्‍या बाजूला 40 टक्के पुरुषांना त्यांच्या वडिलांनी ही माहिती दिली होती. त्या खालोखाल सहकार्‍यांकडून (35 टक्के) ही माहिती मिळाली.
 
या सर्वेक्षणानुसार पुरुष आणि महिलांची प्राधान्यक्रमाची लक्ष्ये सारखीच आहेत : मुलांचे शिक्षण, स्वप्नवत घर, मुलांचे लग्न, कर्जमुक्त आयुष्य आणि उंची जीवनशैली. पुरुषांच्या तुलनेत महिला काहीशा अधिक प्रमाणात मुलांसाठीचा विचार करतात (त्यांच्या पहिल्या तीन प्राधान्यक्रमांमधील दोन आहेत मुलांचे शिक्षण आणि लग्न : 24 टक्के आणि 29 टक्के, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 31 टक्के आणि 26 टक्के आहे). महिलांच्या तुलनेत अधिक पुरुषांना स्वत:चा उद्योग सुरू करायचा आहे आणि निवृत्तीची तजवीज करायची आहे (पुरुषांमध्ये हे प्रमाण 26 टक्के आणि 23 टक्के आहे, तर महिलांमध्ये 23 टक्के आणि 20 टक्के). यातून लक्षात आलेली अत्यंत रंजक बाब म्हणजे, स्त्रिया एकट्या असतानाही भविष्यात होणार्‍या मुलांसाठी बचत करण्याचा विचार करतात (मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 22 टक्के आणि 23 टक्के एकट्या असलेल्या स्त्रिया विचार करतात, तर हेच प्रमाण पुरुषांमध्ये अनुक्रमे 16 टक्के आणि 12 टक्के आहे).
 
गुंतवणूक करताना, गाडी किंवा घर खरेदी करताना निर्णयप्रक्रियेत पुरुषाचा वरचश्मा असतो, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले; तर सोने/दागिने घेणे, दैनंदिन घरगुती खरेदी वगैरेंमध्ये महिलांचा हातभार अधिक असतो. यातील एक महत्त्वाचे निरिक्षण म्हणजे फक्त 12 टक्के महिलांनी सांगितले की, मार्केटमध्ये (स्टॉक, इक्विटी, म्युच्युअल फंड वगैरे) पैसा गुंतवणं हा 100 टक्के त्यांचा निर्णय होता, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 31 टक्के आहे... तब्बल 2.6 पट अधिक! तर दुसर्‍या बाजूला, 28 टक्के महिलांसाठी सोने/दागिने विकत घेणे हा संपूर्णपणे त्यांचा निर्णय होता. हे प्रमाण पुरुषांमध्ये फक्त 17 टक्के आहे.
 
अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश स्त्रियांचा दृष्टिकोन हा गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा आहे. 39 टक्के महिलांनी सांगितले की, त्या आधी गुंतवणुकीचा विचार करतात आणि मग त्यानुसार महिन्याच्या खर्चाची तजवीज करतात (पुरुषांचे प्रमाण 33 टक्के).
 
पैसा या बाबीशी निगडित पुरुष आणि महिला दोघांच्याही व्याख्या समान आहेत : स्वप्नपूर्ती, अधिक चांगले आयुष्य, गरजा, यश आणि चांगले आरोग्य. मात्र, यातून एक आश्चर्याची बाब समोर आली ती म्हणजे बहुतांश काम करणार्‍या, लग्न झालेल्या, पण मूल नसलेल्या महिलांना पैसा म्हणजे ‘पॉवर’ वाटते.
 
गुंतवणुकीचे निर्णय घेताना इतरांचे मार्गदर्शन घेतलेल्यांमध्ये फक्त 42 टक्के महिलांनी व्यावसायिक फायनान्शिअल ॲडव्हायझरची मदत घेतली (पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक म्हणजे 46 टक्के आहे). बहुतांश पुरुष (42 टक्के) आणि महिलांनी (50 टक्के) सांगितले की, फायनान्शिअल ॲडव्हायझरच्या बाबतीत ते लिंगसमानता पाळतात, म्हणजे ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री याचा विचार करत नाहीत. मात्र, दुसर्‍या क्रमांकाची पसंती पुरुष (52 टक्के) आणि महिला (31 टक्के) पुरुष ॲडव्हायझरला देतात. महिला फायनान्शिअल ॲडव्हायझरला पुरुषांच्या तुलनेत 6 पट अधिक महिला पसंती देतात (19 टक्के महिला तर फक्त 3 टक्के पुरुष).
 
आज ग्रामीण विभाग पाहा किंवा शहरी. महिला आपल्या कर्तबगारीने या गुंतवणुकीत मोठी भर घालत आहेत. घरातील कर्त्या पुुरुषाने तिला अडवण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तिची गुंतवणूक सुरू आहे आणि ती येणार्‍या काळात मोठी होणार आहे, यात शंका नाही. नवर्‍यावर काही संकट आलं, मुलाला फ्लॅट घ्यायचा असला, तर आयुष्यभर पै पै जमा केलेली तिची ठेव ती पट्कन मोडते. पण एकदा काम झालं की, तिला सोयिस्करपणे विसरल्या जाते. मुलांसाठी आणि आपल्या नवर्‍यासाठी तिची गुंतवणूकरूपी ही समर्पणाची जी भावना आहे, त्या भावनेचं या समाजाकडून कौतुक व्हायला पाहिजे आणि तिला सहकार्य केलं पाहिजे. काही ठिकाणी असं होतंही. विसरणारे हे चेहरे मग तिला जवळ करीत नाहीत. असं व्हायला नको. कारण स्त्रीची गुंतवणूक ही ताकदीची आहे, तिच्या भरवशावर आपण आयुष्य उभं करतो, हे पुरुषाला समजायला पाहिजे.
(लेखिका डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा.लि.च्या सेल्स, मार्केिंटग आणि ई-बिझनेसच्या संचालक आणि प्रमुख आहेत.)