आणिबाणीची संघर्षनायिका- शारदा गहिनीनाथ डांगे

    दिनांक :05-Jul-2019
नलिनी वरणगावकर
 
आणिबाणीचं पर्व सुरू झालं आणि आमच्या गावातून भराभर संघस्वयंसेवकांना अटक करणं सुरू झालं. माझं माहेर म्हणजे तालुका चिखली. आमचं डांगे कुटुंब म्हणजे संघाचं घराणं. मुलांनी, पुरुषांनी संघात जायचं आणि मुलींनी रा. से. समितीत. हा अलिखित नियम. आम्ही सात भावंडं. आई, दादा (वडील), मोठी आई (आजी), आतेभाऊ राम, दादांचे आतेभाऊ बापूकाका, चुलत भाऊ निरंजन असं भरलं घर होतं आमचं. मी भावंडांत सर्वात थोरली. बाकी बहिणी लहान होत्या आणि भाऊ राजेंद्र तर अवघ्या 9 महिन्यांचा होता.
 
मार्च महिन्यात राजूचं जावळं काढायचा कार्यक्रम ठरला. माझी शांता आत्या मुलांसह या कार्यक्रमाला आली. कार्यक्रम छान पार पडला. पुढे महाशिवरात्र आली आणि महाशिवरात्रीला रात्री ती. दादा पंचमुखी महादेवाच्या मंदिरात भजनाला गेले. ती. दादांना भजनाची अत्यंत आवड असल्यामुळे आठवड्यातले सातही वार भजन असायचं. तसंच त्याही रात्री भजनाला गेले. भजन 1 ते 1।। पर्यंत चाललं. भजन होईपर्यंत पोलिस बाहेर थांबले होते म्हणे. भजन आटोपल्यावर ती. दादांना लगेचच अटक करून मुंबईला ठाण्याला जेलमध्ये घेऊन गेले. 
 
 
आम्ही भावंडं गाढ झोपेत होतो. कसलीशी चाहूल लागली म्हणून उठून बघते तो मोठी आई अन्‌ आत्या रडत होत्या. आई मात्र शांत बसलेली होती. प्रसंग गंभीर होता. घडलेला सर्व प्रकार कळला. खरंतर याआधी चिखलीतून असंख्य संघस्वयंसेवकांना मिसाबंदी म्हणून अटक करून नेलं होतं. भगवानदासजी गुप्ता, डॉ. डागाजी, भालजी काका, गोिंवदराव शेटे काका, जयवंतराव शेटे काका, छबू शेटे काका, आमचे मुख्याध्यापक बाबुराव राजे सर हे सर्व नाशिक सेंट्रल जेलमध्ये होते. सर्वात जास्त स्वयंसेवक मिसाबंदी चिखलीचे होते.
 
आमच्या घरी ती. दादांचे ‘वसंत जनरल स्टोअर्स’ होते आणि दादा विम्याची कामे करायचेत. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यात आम्ही सर्व शिक्षण घेणारे होतो. अशा या कठीण परिस्थितीत माझे काका ती. अण्णा आणि आतेभाऊ राम यांची साथ होती. त्यांनी बरीच परिस्थिती सावरली. दिवस कठीण आणि उदास चालले होते. अशातच आईचे वडील- माझ्या आजोबाांचा मृत्यू झाला. दहा-बारा वर्षांपासून आई-आजोबांची भेट नव्हती. आईची मन:स्थिती कशी असेल बरं त्या वेळी? पण, या सर्व प्रसंगात आई अतिशय धीरोदात्तपणे वागली.
 
मुळातच आमची आई अत्यंत सोशीक, कमालीची कष्टाळू आणि सर्वगुणसंपन्न. माहेरची श्रीमंत होती, पण इथे सासरी आहे त्या परिस्थितीत समाधानाने प्रपंच केला. 14-15 महिने ती. दादाशिवाय प्रपंचाचा एवढा मोठा गाडा चालवणं सोपं काम नव्हतं, पण तिने सहजपणाने आणि शांतपणाने हे दिवस काढले आणि घर उत्कृष्टपणे सांभाळले. तिच्या कष्टाळू आणि समाधानी स्वभावाचा संस्कार तिने आम्हा मुलींना नकळत शिकविला.
 
ती. दादा मिसाबंदी होते तरी घरी दर गुरुवारचे भजन नित्यनेमाने चालूच राहिले. दादांचे भजनी मित्र, पोतदार, टाकळकर, नाना, देशपांडे ही सर्व मंडळी एकत्र येऊन भजन करून जायचे. संघकार्यकर्ते यायचे, दिलासा देऊन जायचे.
 
ती. दादांकडे सगळे सणवार होते. श्रीदत्तजयंती उत्सव, कुलधर्म कुळाचार, नवरात्र, श्रीमहालक्ष्मी सण, हे सर्व सण-उत्सव आईने उत्कृष्ट सांभाळले. ती दादा पॅरोलवर चार-सहा दिवसांकरिता आले होते. त्या काळातही घरातल्या कुठल्याच अडचणींची वाच्यता आईने केली नाही. घरी येणारे जाणारे, पाहुणे यांचं सगळं व्यवस्थित सांभाळलं आईनं. ठाणे जेलमधून ती. दादा नाशिकच्या सेंट्रलमध्ये आले, आतमध्ये संघशाखा भजन, निरनिराळे कार्यक्रम चालायचे. जेलमधले प्रसंग आत्ता आत्तापर्यंत ती. दादा सांगायचे. अटलजींसारखे महान नेते, प्रमोद महाजन आणि संघपरिवारातल्या सर्व थोर कार्यकर्त्यांच्या सहवासात त्यांना राहायला मिळालं. दातेशास्त्रींकडून ज्योतिष्य पंचांग शिकायला मिळालं त्यांना. 
ती. दादांचं व्यक्तिमत्त्व देखणं, बहुआयामी होतं. संभाषणचातुर्य, जबरदस्त पाठांतर होतं. नवीन नवीन पाठांतराची आवड होती त्यांना. असंख्य अभंग पाठ, शेरोशायरी, श्लोक, दोहे, उच्चकोटीचे विनोद सांगणं आणि या जोडीला देवदत्त आवाजाची देणगी त्यांना मिळाली होती. अत्यंत भावपूर्ण, पहाडी आवाज. लग्नामध्ये त्यांनी मंगलाष्टकं म्हटली की मुलींकडचे तर जाऊच देत, मुलाकडच्यांच्यासुद्धा डोळ्यांत अश्रू यायचे. भजन म्हणताना तल्लीन होऊन म्हणायचे. उत्तम हार्मोनियम वाजवायचेे. संगीताचा हा वारसा त्यांनी आम्हा भावंडांना दिला.
प.पू. डॉ. हेडगेवार आणि प.पू. गुरुजी त्यांचं दैवत होतं. त्यांच्या या परिपूर्ण व्यक्तिमत्त्व लाभलेल्या जीवनास आईची तेवढीच खंबीर साथ त्यांना होती. आणिबाणीच्या काळात तर ‘शारदा’ या तिच्या नावाला साजेसं तिचं कर्तृत्व होतं. आणिबाणीच्या काळात, कठीण प्रसंगात आईचे धैर्य, शांतपणा, सोशीकपणा आम्हाला शिकायला मिळाला. खरोखर कोटीश: वंदन तिला!
आज सर्वकाही अनुकूल असूनही एक-दोन मुलं वाढवणं कठीण जाते, जड जातं, पण आईने मात्र आहे त्या परिस्थितीत आनंदाने दिवस काढले. आणिबाणीच्या प्रसंगातून तर आईकडून सोशीकता, शांतपणा, सर्वांना धीर देऊन, खंबीरपणाने राहणे हे शिकायला मिळालं. अशा आमच्या आईचा सर्वांनाच खूप अभिमान आहे.
अशी ही आमची आई- शारदा गहिनीनाथ डांगे- आणिबाणीची संघर्षनायिका!
9921468699