शाळेचे ते दिवस!

    दिनांक :05-Jul-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
जवळपास महिना-दीड महिना बंद असलेले शाळांचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. मुलांच्या किलबिलाटाने शाळा व परिसर पुन्हा गजबजलेला दिसू लागला आहे. आपल्या मुलामुलींना सोडायला येणारे पालक, काही लहानग्यांचे बावरलेले चेहरे, शाळेभोवती झालेल्या पालकांच्या गर्दीत आपली आई किंवा वडिलांना शोधत फिरणारी भिरभिरती नजर.. पावसाची रिपरिप सुरू असेल तर, हा शोध आणखी अवघड होऊन बसतो! तर जरा मोठी मुले आपल्या मित्र-मैत्रिणींना शोधत असतात. जीवलग मैत्रीण किंवा मित्र भेटल्यावर चेहर्‍यावर हास्य उमटते. हे चित्र बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी पाहायला मिळते.
 
एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रगतिपुस्तक हाती पडल्यानंतर किंवा जूनच्या सुरुवातीला नव्या वह्या आणि पुस्तकांची खरेदी होते. तेव्हाच शाळेचे वेध लागतात. केजीत जाणार्‍या मुलामुलींसाठी शाळेचा पहिला दिवस तर रडारडीचा आणि पालकांसाठी कौतुकाचा असतो. जून महिना उजाडताच, आपण शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेचा जो पहिला दिवस असतो, तो कधीच कोणी विसरू शकत नाही. आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती शाळेच्या युनिफॉर्ममधील मी! गुलाबी रंगाचा तो पिनो, पांढरा शर्ट, हातात बॅग, छोटंसं बास्केट आणि रडत-रडत आईला बाय बाय करून वर्गात प्रवेश करतानाची मी. हे सर्व आठवलं तरी चेहर्‍यावर एक सुंदर हास्य उमटतं. किती टेंशन फ्री दिवस होते ते! 

 
 
शाळेचं नवं वर्ष, नवा उत्साहच घेऊन येतं. नवीन वह्या-पुस्तकं, त्यातून येणार तो वास.. नवीन दप्तर.. नवीन सॅण्डल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, महिन्याभराच्या सुट्टीनंतर भेटणारे मित्र-मैत्रिणी! शाळा सुरू होताना, रेनकोट किंवा छत्रीची खरेदीही केली जाते. पण पावसात भिजत-भिजत घरी जाण्याची ती मज्जाच वेगळी. मग जोरात पाऊस आला की, साखळी करून रस्त्यावरून जाणं, एखाद्या डबक्यात मुद्दाम उडी मारून मित्र-मैत्रिणींच्या अंगावर पाणी उडवणं, हे आलंच.
 
पहिली ते चौथी म्हटलं की, बाई आठवतात. माझ्या शाळेत त्यावेळी सर्व विषयांना एकच बाई. बरं! एखादे दिवशी बाईंची गैरहजेरी असली की, अर्धी मुलं या, तर अर्धी दुसर्‍या वर्गात. हे सर्व आठवलं तरी हसू येतं. यानंतर आठवतो तो, पीटीचा तास. आठवड्यातील पीटीचा एक तास हा तास पीटीचा असायचा. त्यातील कवायती म्हणजे फूल ऑन धम्माल!
 
मॉनिटर म्हणजे, एक वेगळंच प्रकरण. वर्गावर नियंत्रण ठेवणारा एक उपशिक्षकच! तोही नुसता दरारा असणारा. काही वेळा तर, मुलांचा मॉनिटर वेगळा आणि मुलींचा मॉनिटर वेगळा. बाई नसल्या तर, वर्गात मस्ती करणार्‍यांची नावं फळ्यावर लिहिणारा, हा मॉनिटर! दुसरी धम्माल म्हणजे, शाळेच्या मधल्या सुट्टीत गेटच्या बाहेरून विकत घेतलेली, िंचचा अन्‌ बोरं! शाळेच्या अंगणातील एका कोपर्‍यात बसून मित्र-मैत्रिणींबरोबर खाताना मजा यायची. पण काही म्हणा त्यावेळच्या त्या दोन रुपयांच्या या खाऊची किंमत आताच्या पिज्झा-बर्गरला येत नाही.
 
साधारपणे जून महिन्यापासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष हे जसे विद्यार्थ्यांसाठी नवी इयत्ता, नवा अभ्यासक्रमाचा असतो. पण दुसरीकडे आई-वडिलांची तारेवरची कसरत सुरू होते. अगदी आठवी-नववी इयत्ता असेल, तर चांगल्या क्लासेसची शोधाशोध सुरू होते. त्यातही मुख्यत: दोन विषय असतात एक गणित आणि दुसरा इंग्रजी! तर, इयत्ता 10वी पास झाल्यानंतर मुले-मुली नव्या जगात प्रवेश करतात. महाविद्यालयाची पहिली दोन वर्षे तर शाळेच्या बंधनातून मुक्त झाल्याच्या आनंदात कधी सरतात, ते कळत नाही. पुढची वर्षे अभ्यास, विविध डे अन्‌ कार्यक्रम यामध्ये जातात. हातात डिग्री घेऊन वास्तवतेच्या जगात आल्यानंतर सुरू होते केवळ पळापळ. आधी नोकरी शोधण्यासाठी, नंतर नोकरीची वेळ पाळण्यासाठी!
 
रोजच्या धावपळीच्या जीवनात, या आठवणींना उजाळा देणं हा एक विरंगुळाच होऊन बसतो. मागच्या बाकावरची ती मस्ती! बाकावरची पेन फाईट, तोंडी परीक्षेला वर्गासमोर स्पीच देताना उडालेली भंबेरी, वाटून खालेल्ला खाऊ, आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी केलेली भांडणे अन्‌ मारामारी! ऑफ पिरेडला इतर विषयांचा पूर्ण केलेल्या वह्या आणि बरंच काही!
 
या गोष्टी अगदी काल परवा घडल्या आहेत, असं वाटतं. व्हॉट्सॲपवर शाळेतल्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे. गुड मॉर्निंगच्या मेसेजसह रोजची चॅटिंग सुरू आहे. त्यावर येणारे अनेक मेसेज कितीही चांगले असले, तरी वर्गातल्या फळ्यावर रोजचा लिहिला जाणारा सुविचार डोळ्यांसमोरून जात नाही. केव्हा तरी निवांत क्षणी आठवणीच्या फळ्यावर अशा काही सुखद घटना फेर धरून नाचतात. पण असे निवांत क्षण असतात तरी कितीसे? त्यामुळे हा फळा जास्त करून कोराच राहतो.
संस्कृत शिक्षिका, महाल, नागपूर