आयुर्वेदातील बहुपयोगी शतधौत घृत!

    दिनांक :05-Jul-2019
वैद्य सुचित्रा कुळकर्णी
 
डिसेंबर महिना हा परदेशातील नातेवाईक इकडे येण्याचा काळ असतो. मग अर्थातच अलिबाबाच्या गुहेतल्या सारख्या विस्मयजनक गोष्टी त्यांच्या सामानातून बाहेर येतात. त्या इतक्या चित्रविचित्र, देखेण्या, मुलायम आणि आकर्षक असतात की त्यांची गरज, उपयोग, फायदा, तोटा या कशाचाही विचार करायला बुद्धी जागेवर रहातच नाही. वर परदेशातल्या गोष्टींची क्वालिटी बघा किती छान असते असं एक अनावश्यक प्रमाणपत्र आपणच देऊन टाकतो. 
 
 
अशाच एका घरी परदेशातून मेकअप पेटी आली होती. मी भेटायला म्हणून गेले, तेव्हा मला ती कौतुकानं दाखवण्यात आली. प्राची तर खूश होती. तिच्या मैत्रिणींसमोर तिचा भाव खाऊन झाला होता. आगामी कोणाकोणाच्या लग्नात याचा कित्ती छान उपयोग होईल ही स्वप्नं बघून झाली होती. यातल्या रंगीबेरंगी पेट्यांव्यतिरिक्त माझं लक्ष गेलं ते विविध क्रीम्स च्या डब्यांकडे! किती प्रकारची क्रीम्स! बापरे! दिवसा, रात्री, आंघोळीनंतर, आंघोळीआधी, चेहर्‍याला, हाताला, पायाला, टाचेला, नखांना, ओठाला.... ब्ला ब्ला ब्ला...
 
‘‘पण मी काय म्हणते? हे सगळी केमिकल्स आहेत, म्हणजे घातक आहेत ना हो? निदान रोज तरी वापरायला नकोत ना?’’ प्राचीच्या आईनं सरळसरळ माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन शत्रूवर नेम धरला.
 
‘‘काहीत्तरी बोलू नकोस! हे शब्द, हा आवाजाचा टोन हे आता घरोघरी परिचित आहे. इतकी महागाची बॉक्स आणली आहे आत्यानं. शिवाय स्टँडर्ड आहे. ठेवून काय तिची पूजा करायची? एखाद्या वर्षात यातल्या सगळ्या गोष्टी डेट-बार होतील आणि वापरता येणार नाहीत. महागामोलाची गोष्ट वाया गेली म्हणत तेव्हा तुम्हीच उसासे टाकत बसाल. फुकटचा शॉट लावतात डोक्याला! प्राचीची तणतण सुरू झाली. मग माझ्याकडे बघून म्हणाली, ‘‘तुम्ही समजवा जरा हिला. परदेशात नवीन नवीन रिसर्च करून अश्या गोष्टी बनवतात म्हणावं. सगळं जग वापरतं.’’
 
‘‘हा तुझा गैरसमज आहे बरं का! सौंदर्य प्रसाधानांमध्ये जी केमिकल्स वापरली जातात त्यावर फारसं संशोधन जगातच कुठे झालेलं नाहीये अजून. त्याची स्टँडर्डस्‌ देखील फारशी सेट झालेली नाहीत. त्यावर नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे सगळा आनंद आहे. एकदा नेटवर जाऊन अभ्यास कर थोडा. यातली कित्येक केमिकल्स ही थेट कॅन्सर निर्माण करणारी आहेत.’’ मी सांगितलं.
 
‘‘असं कसं होईल? मग त्यावर बंदी आली असती ना?’’ तिचा अजाण प्रश्न .
‘‘बंदी येत नाही कारण तिथेही भ्रष्टाचार चालतो.’’ मी थोडक्यात सांगितलं.
‘‘पण सगळे वापरतात... आपल्या नट्या पण! कोणाला काय झालं?’’ तिचं आपलं चालूच होतं.
‘‘अगं, तोंड रंगवल्यावर छान दिसतात तेव्हाच त्या आपल्यासमोर येतात. आजारी असताना कशा येतील? त्यांचे आजार आपल्याला कळत देखील नाहीत.’’ मी समजूत घालत होते.
 
‘‘पण याला आयुर्वेदात काही पर्याय नाही का? बाकीचं जाऊ दे, रोजच्या या शंभर क्रीम्सना तरी पर्याय असेल ना काहीतरी.’’ ‘‘आम्ही आमच्या काळी तेल-हळद, साय, दुध-हळद, दुध-िंलबू, दूध-बेसन, दही... असं काय काय वापरायचो. ते आजच्या मुलींना नको असतं. एकतर कंटाळा आणि ते असं आकर्षक पॅकमध्ये येत नाही ना?’’ ‘‘मग तुम्ही सांगा ना एखादा पर्याय असेल तर?’’ वैद्य लोकांना कोण, कधी, कसे गुगली टाकेल ते सांगता येत नाही.
‘‘हो, आहे ना! शतधौत घृत आहे की आपलं. मस्त काम करतं.’’
‘‘म्हणजे काय?’’ प्राचीनं लगेच विचारलं.
‘‘म्हणजे शंभर वेळा धुतलेलं तूप!’’
‘‘ईईईईईई ! त्याला वास येत असेल तुपाचा. तूप म्हटलं की नव्या पिढीला नक्की कुठे शूळ चालू होतो, हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे.
वास असतो. पण सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरताना आम्ही तो मास्क करतो. हवे ते सुगंध देता येतात त्याला. शिवाय क्रीम बेस दिला की त्याचा तुपकटपणा देखील कमी होतो.’’
‘‘ते कसं वापरायचं?’’ प्राचीच्या आईलाच उत्सुकता जास्त.
 
‘‘रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास, तुम्ही ते तोंडाला आणि हाता-पायांना लावू शकता. त्यानं थंडीत त्वचा फुटत नाही. त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. काळे डाग असतील तर हळूहळू कमी होऊ लागतात. त्वचा मृदू आणि गौरवर्णी होते. टाचेच्या भेगांना पण लावू शकता. क्वचित कधी मेकअप केला तर तो काढल्यावर तोंड धुऊन शतधौत लावावं. इतकंच काय, भाजल्याची आग आणि डाग यावर देखील याचा उपयोग आहे. त्वचेला कुठेही आग होत असेल तर यानं आग शांत होते. डोळ्याभोवतीच्या काळ्या डागांवर हे उपयोगी आहे. करू तेवढे उपयोग.’’
 
‘‘मी उद्या येतेच तुमच्याकडे. आहे ना तयार?’’ प्राचीची आई खुश होऊन म्हणाली. प्राचीनं विरोध केला नाही यातच तिचा होकार आला.
दाहशामक नि मॉइश्चरायझर, लावा कुठेही भाजल्यावर।
सौंदर्य देते शुद्ध स्वभावे, घरोघरी ‘शतधौत’ असावे।।
चिकित्सक, लेखिका, व्याख्याता, समुपदेशक,