सखे तुझे आईपण...

    दिनांक :05-Jul-2019
वैशाली व्यवहारे-देशपांडे
आईपण मला तुझ्या डोळ्यांत, तुझ्या शरीराच्या प्रत्येक रंध्रात, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या चालीत, तुझ्या बोलीत दिसत असतं. ज्या क्षणी तुझ्या उदरात तुझाच अंश आपले अस्तित्व रोवतो, त्या क्षणी तू बनतेस आई आणि तिथून तुझ्या शेवटापर्यंत तू जगतेस फक्त आई म्हणून.
 
खरंतर तू जन्माला येतेस तेव्हाच हा आईपणाचा गुण तुझ्यात जन्मतो. जगातल्या प्रत्येक संस्कृतीचीच ही ओळख आहे. पण, आमच्या भारतीय संस्कृतीची तर ती शक्ती आहे, ऊर्जा आहे. उगाच नाही तुला देवत्व मिळालं. उगाच नाही सगळ्या रूपांमधे तुला आम्ही बघितलं. मातृ, बुद्धी, लक्ष्मी, शांती, क्षमारूप तर तू आहेसच; पण जेव्हा जेव्हा भल्या भल्या देवांनी असुरांपुढे हार मानली तेव्हा तेव्हा ते शक्तिरूप म्हणून तुलाच शरण आले. 
 
 
पण, आम्ही पूजा मात्र तुझ्या मातृरूपाचीच मांडली. तुला त्यात असं काही गुरफटून टाकलं की, तूच विसरलीस तुझं शक्तिरूप आणि आम्ही आमच्या संस्कृतीचे गोडवे गात राहिलो. तुला मखरात बसवलं. तुझी पूजा केली.
 
हळूहळू तुलाच लक्षात आलं की, ही पूजा खोटी नसेलही, पण तुझे गुण सीमित केले त्या देवत्वाने. तुला कळलं की, तुझ्याभोवतीचे पाश आणखी आवळले जात आहेत तुझ्याच नाकर्तेपणामुळे. तू धडपडलीस, त्या मखरातून बाहेर पडलीस. सिद्ध केलंस स्वतःला. पण, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू मापदंड वापरलास तो पुरुषाचं पौरुषत्व मानल्या जाणार्‍या गुणांचाच. तिथेच तू चुकलीस सखे...
 
तू डॉक्टर झालीस, इंजिनीअर झालीस, पायलट, सैनिक झालीस... तुझं कर्तृत्व तू पावलोपावली मोजलंस ते मात्र पुरुषाच्या पावलावर पाऊल ठेवूनच.
 
त्यामुळे पुरुषालाही कळलं नाही की, त्यानं आता काय करावं... कसं वागावं? कारण तोच श्रेष्ठ, हा समज तूच तर तुझ्या वागण्यानं करून दिलास.
 
त्याला भीती वाटली. तू त्याची जागा बळकावशील याची. त्याचं प्रभुत्व संपेल याची आणि इथेच तू सर्वात मोठी चूक केलीस सखे...
 
तू पुरुष बनण्याचा प्रयत्न केलास...
एक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला असतास, तर आज फसली आहेस अशा चक्रव्यूहात कधीच फसली नसतीस. आता तू आहेस आई आणि तू आहेस बापाच्याही सगळ्या रूपात. बाप मात्र तडफडतोय स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात...
तू एक व्यक्ती बनली असतीस, तर तोही उतरला असता त्याच्या पौरुषाच्या अभिमानाच्या संकल्पनेतून खाली जमिनीवर... चालला असता तुझीच वाट... एक उत्तम व्यक्ती बनण्याची!
 
आपल्या संस्कृतीने, परंपरेने, समाजाने त्याच्यातल्या मातृत्वाला कधी व्यक्तच होऊ दिलं नाही. त्याच्या मनातल्या कोवळ्या भावना, त्याच्या हातातली नाजूक कलाकुसर व्यक्त करायला घाबरला तो.
घे सखे त्याचा हात हातात... आता दोघं मिळून मार्ग बदला.
 
तुझ्यातल्या पौरुषाला त्याने जागवलं. आता त्याच्यातलं मातृत्व तू जागव.
तुला बदलाची सवय आहे. संघर्षाचा अनुभव आहे. त्याला तो नाही...
त्याला आश्वस्त कर. धर वाट नव्या युगाची.
 
स्त्री आणि पुरुष म्हणून नाही, तर दोन परिपूर्ण व्यक्तींच्या सहजीवनाची आणि आदर्श समाजव्यवस्थेची...