केबल कंपनीच्या कर्मचाऱ्याची महावितरणच्या कर्मचाराला मारहाण

    दिनांक :05-Jul-2019
कारंजा येथे केबल कंपनीच्या कर्मचाऱ्याची महावितरणच्या कर्मचाराला मारहाण, गुन्हा दाखल
 
वर्धा: जिल्ह्यातील कारंजा येथे खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने वाद घालत महावितरणच्या कर्माचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन आग्रसे असे पीडित महावितरणच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे, तर शशिकांत दहीरवाल असे आरोपीचे नाव असून तो नागपूरचा रहिवासी आहे.

 
 
कारंजा शहरात विदर्भ फायबर केबलच्या माध्यमातून नगर पंचायतमध्ये ब्रॉडबँड जोडणीसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याच केबल कंपनीचा कर्मचारी शशिकांत हा विद्युत खांबावर चढून केबलसाठी क्लॅम्प लावण्याचे काम करत होता. दरम्यान वीज वितरण कंपनीचा कर्मचारी किसन कर्तव्यावर जात असताना त्याला शशिकांत दिसला. किसन यांनी पावसाळ्याच्या दिवसात पोलवर कोणाच्या परवानगीने चढला? अशी विचारणा त्याला केली. यावेळी शशिकांतने खाली उतरून वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एवढ्यात वीज वितरण कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार नजरेस पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बघताच आरोपीने तेथून पळ काढला. वीज वितरण कंपनीच्या संतप्त कर्मचाऱ्यांनी कारंजा पोलीस ठाणे गाठले. संबंधित प्रकराविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार शशिकांतविरोधात शासकीय कर्मचाऱ्याला कामात अडथळा आणून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शशिकांत दहीरवाल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलीस शिपाई प्रमोद थूल करीत आहे.