Budget 2019: कोट्यधीशांवर कराचा बोजा वाढणार

    दिनांक :05-Jul-2019
 
नवी दिल्ली,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाच्या प्राप्तीकररचनेमध्ये कोणताच बदल केला नसला तरी कोट्यधीशांवरचा कराचा बोजा मात्र वाढवण्यात आला आहे. १ कोटीहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना करावर आता अधिभारही भरावा लागणार आहे. जितके जास्त उत्पन्न तितका जास्त कर ही निती अवलंबणार असल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
 
 
सोळाव्या लोकसभेतील शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पियूष गोयल यांनी पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलं होतं. ५-१०लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के तर १० लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागणार असल्याची घोषणा केली होती.
सतराव्या लोकसभेतील पहिला अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी करमर्यादेत वाढ केलेली नाही. तसंच १ कोटीपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांच्या प्राप्तीकररचनेत कोणताच बदल होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पण १ कोटी-२ कोटी उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के करावर २ टक्के अधिभार भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे २ कोटी ते ३ कोटी उत्पन्न असणाऱ्यांना ३०टक्के तर ३ कोटी ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के अधिभार भरावा लागणार आहे. ५ कोटींहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना मात्र सात टक्के अधिभार ३० टक्के करावर भरावा लागणार आहे. यामुळे कोट्यधीशांच्या डोक्यावरचा कराचा भार वाढला आहे.