आयुष्यात दुसरी संधी क्वचितच मिळते- मलायका अरोरा

    दिनांक :05-Jul-2019
मलायकाने अरबाज खानला घटस्फोट देऊन आता बरेच महिने लोटले आहेत. मलायकाने आता खुलेपणाने अर्जुनचं नातं स्वीकारलं आहे. ‘आयुष्यात दुसरी संधी क्वचितच मिळते,’ असं म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
 
 
मलायका-अर्जुनच्या नात्यावर अनेकांनी टीका केली. ‘लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाही. मी फक्त माझा मुलगा, माझं कुटुंब, माझा साथीदार आणि माझ्या मित्र-मैत्रिणींचा विचार करते. घटस्फोटापूर्वीही मी माझा मुलगा अरहानची तेवढीच काळजी करायची आणि आताही तेवढीच करते. तेव्हा मी विवाहित होते आणि आता घटस्फोटीत आहे हाच काय तो फरक. काहींचं लग्न टिकतं तर काहींचं नाही टिकत. उलट मी याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. आता मला प्रेमाची दुसरी संधी मिळाली आहे. आयुष्यात दुसरी संधी क्वचितच मिळते. त्यामुळे मी किंवा माझ्यासारख्या इतर महिलांनी ही संधी का नाही स्वीकारावी?,’ असा सवाल तिने केला आहे.
यावेळी मुलाविषयी ती पुढे म्हणाली, ‘रिलेशनशिपमध्ये असल्याने आई म्हणून माझी जबाबदारी कमी होत नाही. प्रत्येक आईप्रमाणे मी माझ्या मुलाची तितकीच काळजी करते. एकल मातृत्व असल्याने उलट माझी जबाबदारी वाढली आहे. कारण मुलाच्या आयुष्यात कोणाची कमतरता जाणवू नये म्हणून मला अधिक काळजी घ्यावी लागते. अरबाज आणि मी जरी विभक्त झालो तरी अरहानला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतो.’