मध्यमवर्गाला घर घेणं झालं सोपं!

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली,
घराची चिंता भेडसावणाऱ्या मध्यमवर्गाला आता घर घेणं सोप्पं होणार आहे. ४५ लाख किंमतीचं घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बांधकाम क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला आहे.

 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांचा वर्षाव करतानाच घर खरेदीतीही दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट २ लाखाहून ३.५ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २.५ लाखापर्यंतची इलेक्ट्रीक वाहन खरेदीवरही मोठी सूट देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम क्षेत्राची पिछेहाट होत होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच घरांच्या खरेदीवर दीड लाख रुपयांचं व्याज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. प्रत्येक गावात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागातील रस्त्यांवर ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, असं सांगतानाच २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी देण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.