अनिवासी भारतीयांना लगेच आधार कार्ड मिळणार

    दिनांक :05-Jul-2019
दिल्ली,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनिवासी भारतीयांसाठी खुशखबर दिली आहे. यापुढे भारतात आल्यावर अनिवासी भारतीयांना आधार कार्डसाठी ६ महिने थांबावे लागणार नसून तातडीने आधार कार्ड मिळणार आहे.
 
 
मोदी २.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण आज होत आहेत. कृषी क्षेत्र, उद्योजकांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. त्याचवेळी अनिवासी भारतीयांसाठीही या अर्थसंकल्पाने दिलासा दिला आहे. पूर्वी भारतात आल्यावर सहा महिने अनिवासी भारतीयांना आधार कार्डसाठी थांबावे लागत असे. आता मात्र अनिवासी भारतीयांना पासपोर्टच्या आधारावर लगेच आधार कार्ड मिळणार आहे. त्यांना कोणत्याच प्रकारची अडवणूक केली जाणार नाही अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत पासपोर्ट प्रक्रियेचं सुलभीकरण केलं आहे. तसंच विदेशी पर्यटकांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची सुविधाही देण्यात आली आहे. याच प्रक्रियेतील पुढचं पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जातं आहे. तसंच अनिवासी भारतीयांना देशात परकीय गुंतवणूकीच्याच मार्गाने गुंतवणूक करता येणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. तसंच अनिवासी भारतीयांना यापुढे शेअर मार्केटमध्ये मुक्तपणे गुंतवणूकही करण्यात येणार आहे. आतापर्यंत लादण्यात येणारे निर्बंध आणि कर यापुढे लागू होणार नाही. जास्तीजास्त अनिवासी भारतीयांनी भारतात येऊन व्यापार वाढवावा म्हणून केंद्र सरकारने ही पाऊलं उचलल्याची चर्चा आहे.