CWC2019: पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर

    दिनांक :05-Jul-2019
लंडन,
२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचे आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला ३१६ धावांचे आव्हान दिले. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला ७ धावांच्या आत सर्वबाद करायचे होते. हे अशक्यप्राय आव्हान पाकिस्तानी गोलंदाज पूर्ण करु शकले नाहीत. फिरकीपटू मोहम्मद हाफिजने पहिले षटक निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली. मात्र मोहम्मद आमिरच्या दुसऱ्याच षटकात बांगलादेशी सलामीवीरांनी ७ धावा काढत पाकिस्तानला स्पर्धेबाहेर ढकलले आहे. 
 
आपले आव्हान कायम टिकवण्यासाठी पाकिस्तानला किमान ३०८ धावा करणे गरजेचे होते. इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखार झमान मोहम्मद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. इमाम उल-हकने १०० चेंडूत १०० धावा झळकावत संघाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावसी. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली. सैफुद्दीनने बाबर आझमला माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली. अवघ्या ४ धावांनी बाबर आझमचं शतक हुकलं. यानंतर शतकवीर इमाम उल-हकही हिट विकेट होऊन माघारी परतला. मोहम्मद हाफीज, हारिस सोहेल हे फलंदाजही झटपट माघारी परतले.
यानंतर मधल्या फळीत इमाद वासिमने ४३ धावांची फटकेबाजी करत पाकिस्तानला ३१५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने ५, मोहम्मद सैफुद्दीनने ३ तर मेहदी हसनने १ बळी घेतला.