सार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली,
देशातील सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊल उचलणार असून यासाठी तब्बल ७० हजार कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्पात दिली.
 
 
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक केले. मागील वर्षभरात १ लाख कोटींनी एनपीए कमी झाला असून केंद्र सरकार सार्वजनिक बँकांना ७० हजार कोटींची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी दिली. देशातली बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारचा आधीपासून प्रयत्न राहिला असून तो याहीपुढे कायम राहिल असे त्या म्हणाल्या. गेल्या ४ वर्षांत बुडीत खात्यात गेलेले ४ लाख कोटी रुपये हे बँकांना परत मिळाले आहे, असेही त्या म्हणाल्या. देशाचे गुंतवणुकीचे लक्ष्य १.०५ कोटी रुपये आहे. क्रेडिट ग्रोथमध्ये १३.८ टक्क्यांची वाढ झाली असून NBFC ला बाजारातून फंड मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. तसेच गृहप्रकल्पांसाठीच्या वित्त पुरवठ्याचे नियंत्रण रिझर्ल्व बँकेकडे येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.