धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष नक्षल भूसुरुंगस्फोटातील आरोपी

    दिनांक :05-Jul-2019
गडचिरोली:  महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे.
 
 
 
३० एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडज्ञ-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. यात १५ पोलिस व एका खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या प्रकरणी अलिकडेच विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी कुरखेड्याचे तत्कालिन उपविभागीय पोलिस अधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी भूसुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का व तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन व अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्‌या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ्ज्ञ म्डावी, किसन हिडामी व सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली. पोलिस कोठडीदरम्यान या पाच जणांची विचारपूस केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष  कैलास प्रेमचंद रामचंदानी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
२९ जूनला कुरखेडा येथील व्यावसायिक कैलास प्रेमचंद रामचंदानी यास अटक केली. कैलासचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, तो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताही आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्षच अडकल्याने खळबळ माजली आहे. त्याचा या घटनेत नेमका कसा सहभाग होता, किती दिवसांपासून तो नक्षल्यांच्या संपर्कात होता, याविषयी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान एका प्रमुख राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्षच या प्रकरणात अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.