झायरा वसीमचे अभिनंदन!

    दिनांक :05-Jul-2019
नमम 
श्रीनिवास वैद्य  
 
झायरा वसीम या 18 वर्षीय अभिनेत्रीने चित्रपटातून काम न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, भारताच्या सेक्युलर तसेच उजव्या वैचारिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. तशी पाहिली तर ही एक साधी घटना आहे. एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटात काम करायचे की नाही, हा तिचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु, झायराच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. याला काही कारणेही आहेत. मुळात ही काश्मीरची आहे. काश्मीरची एखादी सुस्वरूप तरुणी चित्रपटात काम करते, हेच अप्रूप आहे. तिने 13 व्या वर्षीच आमिर खान यांच्या ‘दंगल’ चित्रपटात महिला कुस्तीपटूची भूमिका रंगविली. मुल्लांच्या इस्लामला हे कधीच सहन होऊ शकत नाही. त्यामुळे तिच्यावर मुल्लांच्या इस्लामीबंद्यांनी प्रचंड टीका केली, धमक्या दिल्यात. पण ती बधली नाही. या तिच्या ठामपणाचे सर्व सेक्युलर विचारवंतांनी प्रचंड कौतुक केले. नंतर एका घटनेत, विमानातून प्रवास करताना तिला मागे बसलेल्या एका प्रवाशाचा पाय लागला. खरेतर याची तक्रार हवाईसुंदरीकडे करून प्रकरण तिथेच संपविता आले असते. परंतु, यशाची नशा डोक्यात गेल्यामुळे असेल, झायराने हे प्रकरण सोशल मीडियामार्फत गाजविले. बिचारा तो तरुण हकनाक काही दिवस पोलिस कस्टडीत राहिला. त्यानंतर मानभावीपणाने झायराने आपली तक्रार मागे घेतली, तेव्हा कुठे त्याची सुटका झाली. या घटनेनंतर अनेकांच्या मनातून झायराची प्रतिमा खालावली. लोक या प्रकरणाला आणि झायरा, दोघांनाही विसरले असतानाच, झायराने चित्रपटातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि ती पुन्हा प्रकाशात आली.
 
 
 
हा निर्णय घेताना तिने इस्लाम आणि कुराणचा दाखला दिल्याने, तिच्यावरील टीकेला जरा जास्तच धार चढली. माझ्या चित्रपट कारकीर्दीमुळे मी इस्लाम आणि कुराणपासून दूर जात असल्याचे लक्षात आले. म्हणून मी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत असल्याचा सारांश असलेले तिचे लांबलचक पत्र सोशल मीडियावर येताच, उजवे विचारवंत इस्लामच्या कट्‌टरपणावर, इस्लाममधील महिलांच्या गळचेपीविरुद्ध प्रतिक्रिया देऊ लागले. तिकडे सेक्युलर टोळी शांत होती. कारण, तिने इस्लाम व कुराणचा हवाला दिल्यामुळे, झायराच्या निर्णयाविरुद्ध प्रतिक्रिया दिल्यास, आपल्या सेक्युलरी बाण्यास धक्का पोहचू शकतो, असा विचार या लोकांनी केला असावा. बघा ना, एरवी नको त्या विषयात नाक खुपसणारे शबाना आझमी, जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह, आमिर खान चूप आहेत. पत्रकारजगतात स्वत:ला महान समजणार्‍या काही मुस्लिम महिलांनी झायराच्या निर्णयाचे कौतुक करत, तिने दिलेले समर्थन उचलून धरले आहे. उजवे विचारवंत, आता झायराचे आयुष्य काळ्या बुरख्याआड वाया जाणार म्हणून खंत व्यक्त करीत आहेत. फतवे काढणारे मुल्ला-मौलवी मात्र खुष आहेत. वाट चुकलेली आपलीच एक पोरगी परत कळपात परत आल्याचा त्यांना आनंद आहे. हा आनंद जरा जास्तच आहे. कारण, एवढ्यात बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नुसरत जहान प्रकरणामुळे ही मंडळी अत्यंत अस्वस्थ होती. अभिनेत्री नुसरतने तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर संसदेत प्रवेश केला आहे. तसेच बंगालमधील एका हिंदू उद्योगपतीसोबत विवाहही केला. विवाह हिंदू धर्माप्रमाणे झाला. एवढेच नाहीतर, संसदेत खासदारकीची शपथ घेते वेळी नुसरत संपूर्ण बंगाली नववधूचा पेहराव करून आली होती. मंगळसूत्र, हातात पवित्र पांढरी बांगडी आणि कुंकूदेखील होते. या घटनेने अस्वस्थ झालेल्या मुल्ला-मौलवींना, झायराच्या निर्णयाने समाधान व शांती लाभली नसती तरच नवल होते. असो.
 
समर्थनार्थ किंवा विरोधातील प्रतिक्रियांच्या या गदारोळात, मी मात्र झायरा वसीमच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि ज्या वेळेस तिच्या समोर चित्रपटसृष्टीची आकर्षक कारकीर्द स्वागताला उभी असताना, तिने या चमचमत्या क्षेत्राकडे पाठ फिरवली म्हणून तिचे अभिनंदनही करतो. सर्व सुजाण नागरिकांनीही झायराच्या या निर्णयाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. लोक म्हणत आहेत की, झायराला स्वत:च्या आयुष्याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार नाही का? ज्या ‘करीअर’साठी तमाम तरुणी रात्रंदिवस लाळ गाळत असतात, ते यश तिच्या पायाशी लोळण घेत असताना, तिने हा निर्णय घेऊन स्वत:चे आणि चित्रपटसृष्टीचे फार नुकसान केले आहे. झायरा मुस्लिम तरुणींसाठी एक रोल मॉडेल होती. वगैरे, वगैरे.
 
पण खरे सांगू, ज्या चित्रपटसृष्टीसाठी सर्व लोक एवढे चिंतातुर आहेत, त्या चित्रपटसृष्टीत आता राहिले तरी काय? ना कला राहिली, ना अभिनय. ना कालजयी संगीत राहिले, ना उत्कृष्ट कथाबीज. आतातर अभिनेत्रींच्या अंगावरील कपडेदेखील राहिले नाहीत. अशा या सडलेल्या चित्रपटसृष्टीतून झायराने निवृत्ती घेतली, हे चांगलेच झाले, नाही का? हे आजच्या चित्रपटसृष्टीला लागू आहे. जुन्या काळातील चित्रपटसृष्टी खरेच अभिमान बाळगण्यालायक होती. त्याकाळचे दिग्दर्शन, संगीत, अभिनय, कथाविषय... कुठलाही मुद्दा घ्या, चित्रपटरसिकांना घायाळ करणारा, वेड लावणारा होता. आज इतकी वर्षे झालीत तरीही, रसिक अजूनही जुन्या चित्रपटांना विसरू शकले नाहीत. चित्रपटाच्या प्रत्येक अंगात त्या काळी एकेक हिमशिखरे होती. पुरेशी संसाधने नसतानादेखील अंगभूत प्रतिभेच्या जोरावर या मंडळींनी चित्रपटांना जी उंची दिली, ती आजही स्तिमित करणारी आहे. आज संसाधने, पैसा आणि तंत्रज्ञान विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही, आजच्या चित्रपटांना ती उंची तर सोडाच, पण त्याच्या आसपासही जाता आलेले दिसत नाही. इतका कचरा या क्षेत्राचा झाला आहे किंवा करण्यात आला आहे. जुन्या काळातील एकेका नटीचे नुसते नाव घेतले तरी तिची अभिनयसंपन्न सुगंधित आकृतिरेषा डोळ्यांसमोर उभी राहते. मधुबाला, नूतन, गीता दत्त, मीनाकुमारी, वैजयंती माला, वहिदा रहमान, जया भादुरी... हीच गोष्ट दिग्दर्शकांची, संगीतकारांचीदेखील आहे. अशी सप्ततारांकित चित्रपटसृष्टी जर झायराने सोडली असती, तर निश्चितच मला वाईट वाटले असते.
 
आजची चित्रपटसृष्टी भयंकर आहे. कपडे उतरविण्याची किती तयारी आहे, हीच आजकाल नटीची पात्रता झाली आहे. अभिनय तर सोडाच, पण साध्या, सोज्ज्वळ वेशभूषेनेही चित्रपटात सप्तरंग भरता येतात, हे कुणाच्याच गावी नाही. अंग झाकणे हे कपड्याचे आद्य कर्तव्य आहे, हेच विसरून गेले आहेत. कुठलाही पुरस्कार सोहोळा बघा. लाल गालिच्यावर येणारे नट नखशिखान्त कपड्यांनी येतात. परंतु, नट्या? शिसारी येईल इतक्या उघड्या अंगाने ठुमकत ठुमकत येताना दिसतात. मागे 25 मीटर कापड हवेवर उडत असते आणि इकडे शरीर जेमतेम झाकलेले... तुमच्या सभ्यतेवर उपकारच जणूकाही!
आजकालच्या चित्रपटातील कुठलेही गाणे बघा... नायक पूर्ण कपड्यानिशी असतो. त्याला नाच करताना त्या कपड्यांचा कुठलाही अडथळा होत असल्याचे दिसून येत नाही. पण, नट्यांना काय होते माहीत नाही. अंगावरचा कपडा म्हणजे जणूकाही भिंतीवरची पाल आहे, अशा तिटकार्‍याने त्या कपडा अंगावर ठेवतच नाही. अश्लील हावभावांचे तर बोलायलाच नको. चित्रपटाला कथा नसते, दिग्दर्शनाच्या नावाने बोंब असते, संगीत तर शहारे आणणारे असते, नृत्याचे तेच तेच ठेके आणि तेच ते हातापायांचे झटके... अशात या नट्यांचे कपड्यांशी साप-मुंगसासारखे वैर... सगळा चोथा झाला आहे. आजकालच्या चित्रपटातून प्रतीकात्मकता केवळ हरविलीच नाही, तर मृत पावली आहे. असे हे कलेवर बघण्यात आणि त्यात काम करण्यात, काय अर्थ आहे? परंतु, मिळणारी रुपेरी प्रसिद्धी आणि प्रचंड पैसा यासाठी जर कुणी ही असली थेरं करण्यास तयार असेल तर त्याचा निर्णय त्यालाच लखलाभ. झायराने यापासून दूर होण्याचा निर्णय वयाच्या केवळ 18 व्या वर्षी घेतला म्हणून तिचे कौतुक करायचे; तिने हा निर्णय मुल्ला-मौलवींच्या दबावाने घेतला असला किंवा इस्लाम व कुराणाच्या प्रेरणेने घेतला असला तरीही! इस्लाम किंवा कुराणमुळे या असल्या सडक्या चिखलापासून दूर होण्याची प्रेरणा मिळत असेल, तर हिंदू तरुण-तरुणींनी इस्लामपासून एवढे तरी शिकायला काही हरकत नाही.
9881717838