Budget 2019: छोट्या दुकानदारांना मिळणार पेन्शन

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली,
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्याच बजेटमध्ये दुकानदारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील ३ कोटी छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून दुसऱ्या कार्यकाळातही यासारख्या योजना सुरूच राहणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्पावेळी दिली.
 
 
छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारने याआधीच या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. जीएसटीअंतर्गत ज्या व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल दीड कोटींच्या खाली आहे. त्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लघु, मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी ३५० कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म करणे हे सरकारचे ध्येय आहे.
 
आपल्या सरकारची पुढील मोठी उद्दीष्टे जलमार्गांना प्रोत्साहन देणे आहे. तसेच, आम्ही वन नेशन, वन ग्रिडकडे जात आहोत. यासाठी आम्ही ब्लू प्रिंट तयार केली आहे. मेट्रोचे जाळे वाढवण्यासाठी ३०० किमीच्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्या म्हणल्या. इलेक्ट्रीक वाहनांनाचा वापर वाढणवण्यासाठी सूट देणार आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत रस्त्यांचा चांगला विकास होणार असून यातून छोट्या शहरांना जोडले जाणार आहे. भारतमाला प्रकल्पाने व्यवसायवृद्धी होणार आहे. रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर बनवणार आहे. या रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वेच्या विकासासाठी PPP मॉडेल लागू करणार असल्याची माहितीही सीतारामण यांनी संसदेत दिली.