अमेठीवासीयांनी मला मोठी बहीण म्हणून निवडले : स्मृती इराणी

    दिनांक :06-Jul-2019
अमेठी,
लोकसभा निवडणुकीत अमेठीवासीयांनी आपल्याला खासदार म्हणून नव्हे, तर मोठी बहीण म्हणून निवडून दिले आहे. अमेठी आणि येथील जनतेकरिता सर्वोत्तम असे काहीतरी करण्याचा माझा निर्धार आहे, असे सांगताना, अमेठीच्या विकासाकरिता आपण 50 कोटी रुपयांचा प्रकल्प आणला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी येथे केला. 
 
 
अमेठी हा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नसून, माझे ते घर आहे. येथील जनतेचा सन्मान जोपासण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, कारण त्यांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपली मोठी बहीण म्हणून निवडले आहे, असे स्मृती इराणी यांनी अमेठीच्या जगदीशपुरा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
 
मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक कुटुंबाने मुलींना उच्च शिक्षण देणे आवश्यक आहे. मुली शिक्षित झाल्यानंतर त्यांचे घर आणि परिणामी समाजही शिक्षित होत असतो. आगीच्या घटना रोखण्यासाठी अमेठीतील प्रत्येक विभागात अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. माझ्या खासदार विकास निधीतून आणि उत्तरप्रदेश सरकारच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.