कर्नाटकात सरकार संकटात, काँग्रेसच्या ९ तर जेडीएस ३ आमदारांचा राजीनामा

    दिनांक :06-Jul-2019
बंगळुरू,
कर्नाटकात काँग्रेसचे ९ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या १२ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे. मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. 

 
 
त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधलया १२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
 
दरम्यान कोणीही राजीनामा देणार नाही मी काँग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहे असं कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्ही राजीनामा देत आहोत कारण आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होतं आहे. याबाबत कोणालाही दोष देणार नाही असंही रामलिंगा रेड्डी या आमदाराने म्हटले आहे.
 
 
या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर जेडीएस आणि काँग्रेस नेत्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय निर्णय़ घेतला जातो त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत.