बिअरच्या बाटलीवर महात्मा गांधींचे चित्र; टीकेनंतर कंपनीचा माफीनामा

    दिनांक :06-Jul-2019
जेरुसलेम,
बिअरच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर इस्रायली मद्य कंपनीने माफी मागितली आहे. इस्रायलमधील ‘मल्का’ या मद्यनिर्मिती करणार्‍या कंपनीने भावना दुखावल्याबद्दल भारत सरकार आणि भारतीयांची माफी मागितली आहे. 

 
 
‘आप’चे नेते संजय सिंह यांच्यासह राज्यसभेतील काही सदस्यांनी निषेध व्यक्त करून हे प्रकरण उजेडात आणले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना या विषयावर चौकशी आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
 
इस्रायलच्या 71 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या बाटलीवर महात्मा गांधींसह जगातील काही देशांच्या नेत्यांचे चित्र छापण्यात आले होते. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित बाटल्यांचे उत्पादन आणि पुरवठा थांबवण्यात आला.
 
दरम्यान, या प्रकरणावर केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅबी जोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक‘ार केली होती. जोस यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाही पत्र लिहून संबंधित मद्य कंपनी आणि मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
 
दरम्यान, भारत सरकार व भारतीय जनतेच्या भावना दुखावल्याने आम्ही क्षमा मागतो. आम्हीही महात्मा गांधींचा सन्मान करतो. बाटल्यांवर त्यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशा शब्दात कंपनीचे ब्रॅण्ड व्यवस्थापक गिलाड ड्रोर यांनी माफी मागितली. भविष्यात पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत, अशी ग्वाहीही ड्रोर यांनी दिली.