सर्वत्र भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाचीच चर्चा : मोदी

    दिनांक :06-Jul-2019
वाराणसी,
आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे जाहीर सभेत बोलताना म्हटले. 
 
मोदी म्हणाले, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल टीव्हीवर आणि आज वर्तमानपत्रांमधून तुम्ही भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयाबाबत ऐकले-वाचले असेल. सर्वत्र सध्या याचीच चर्चा सुरु आहे. ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय आहे, ते प्रत्येक भारतीयाशी कसे जोडले गेलेले आहे, हे तुम्हाला कळायला हवे. इंग्रजीतील size of the cake matters या म्हणीप्रमाणे जर केक मोठा असेल तर आपल्याला त्याचा तुकडाही मोठाच मिळेल. त्यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलर करण्याचे ध्येय ठेवले आहे.
 
 
काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आम्ही ५ ट्रिलिअन डॉलरचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले आहे. तसेच यासंदर्भातील निर्णयांची घोषणाही केली. आम्ही पुढील दहा वर्षांचे व्हिजन गाठण्यासाठी पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखवला. त्यानुसार, आपण पुढील पाच वर्षात नक्कीच ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. आम्ही ५ मिलिअन डॉलरचे ध्येय नक्कीच गाठू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. मात्र, काही जण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत, जाणीवपूर्वक निराशेचे वातावरण पसरवणारे हे लोक आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर असून इथल्या विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाचेही त्यांनी वाराणसीत उद्घाटन केले.