आईचा मृतदेह घरातच पुरण्याचा मुलाचा प्रयत्न

    दिनांक :06-Jul-2019
धामणगाव तालुक्यातील शेंदुरजना खुर्द येथील घटना
धामणगाव रेल्वे: आपल्या जन्मदात्या आईचा मृतदेह राहत्या घराच्या अंगणात पुरण्यासाठी खड्डा खोदून तिचा दफनविधी करण्याचा प्रयत्न स‘या मुलाकडून झाल्याची घटना तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध मृतक आईचे नाव त्रिवेणी वायलूजी पाटील आहे. ही घटना शनिवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या व गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीधर वायलूजी पाटील (45) हे शनिवारलासकाळच्या सुमारास आपल्या अंगणात एक भला मोठा खड्डा खणत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. शेजार्‍यांनी या संदर्भात आश्र्चर्याने विचारणा केली असता गिरीधरने उत्तर न देता आपले खड्डा खोदण्याचे काम सुरूच ठेवले. तसेच गिरीधरची म्हातारी आई सुद्धा घराबाहेर दिसली नसल्याने शेजार्‍यांचा संशय बळावला. या प्रकाराने शेजारील नागरिक घाबरले. त्यांनी पोलिस पाटलाकडे धाव घेतली. त्यावरून पोलिस पाटील मनीष राजूरकर यांनी यासंदर्भात गिरीधर यांच्याकडे विचारणा केली असता माझ्या घरात पाऊल ठेवायचे नाही, असे म्हणून गिरीधर त्यांच्या अंगावर धावून आला. पोलिस पाटलांनी लगेच तळेगाव दशासर पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान तळेगाव दशासर ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल दिलीप सावंत, निलेश राऊत यांनी घटनास्थळ गाठले. त्याच्या घराची पाहणी केली असता खोलीत खाली चटईवर आईचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी लगेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
या घटनेसंदर्भात गावकर्‍यांशी चर्चा केली असता गावात कोणी बोलत नसल्याने अंत्ययात्रेस कोणी सहकार्य करणार नाही, अशी भावना गिरीधरची झाल्यामुळे त्याने खड्डा खणला असावा असे लोकांच्या तोंडून कळले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार असून त्यानंतरच तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचे हेडकॉन्स्टेबल दिलीप सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.