अर्थसंकल्पामुळे भारताच्या विकासाची गती वाढेल : अरुण जेटली

    दिनांक :06-Jul-2019
नवी दिल्ली, 
संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक चांगल्या तरतुदी आहेत. यामुळे आर्थिक विकासाची गती प्रचंड वाढेल, असा विश्वास भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केला. 
 
 
मजबूत अर्थव्यवस्था आणि चाणाक्ष राजकारण यातील कोणत्याही एकाची निवड केल्यास काय होईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. माझ्या मते, ही निवडच मुळात चुकीची आहे. कारण, माझ्या सरकारला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या कारकीर्दीत मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच चाणाक्ष राजकारणावरही भर देण्यात आला होता, असे जेटली यांनी आपल्या फेसबुक ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
 
अर्थसंकल्पात देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्याकरिता एक राजकीय दिशा देण्यात आली आहे. यात ज्या क्षेत्रांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ती क्षेत्रे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असणार्‍या घटकांशी संबंधित आहेत. यात प्रामु‘याने स्वस्त घरे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, पायाभूत, बांधकाम आणि रियल इस्टेस क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तर होईलच, शिवाय गुंतवणूकही वाढेल, असे जेटली यांनी यात नमूद केले आहे.
 
जगात अतिशय गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा दबदबा नेहमीच कायम राहणार आहे. मागील दीड ते दोन वर्षांतील आर्थिक विकासाचा दर याचीच साक्ष देतो आणि आता तर अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आर्थिक विकासाला नवीन दिशाच लाभली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.