अतर्क्य आणि अनपेक्षित

    दिनांक :06-Jul-2019
हे जग चित्रविचित्र घटनांनी भरलेलं आहेे. आपल्या आसपास विविध घटना घडत असतात. काही गोष्टींवर, घटनांवर विश्वास ठेवणं कठीण जातं. अकल्पित, अतर्क्य असं काहीतरी घडत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर सुकलेलं रोपटं काढून टाकावं असा विचार आपल्या मनात अगदी सहज येतो. पण आपण कंटाळा करतो. दुसर्‍या दिवशी त्या रोपट्याला नवी पानं आलेली असतात. इवली इवली पानं आपल्याला खुणावत असतात. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. अगदी चढायलाही जागा नसते. बसण्यास जागा मिळण्याची सुतराम शक्यता नसते. अशा वेळी अचानक कोणीतरी उठतं आणि बसायला जागा मिळते. वाहत्या नद्यांचं वैराण जमिनीत रूपांतर होतं. आयुष्यात यशस्वी म्हणवणारेे अनेक जण अखेरच्या क्षणी भुकेकंगाल होतात. एकंदर अनपेक्षित असं बरंच काही आपल्या आसपास घडत असतं. 

 
 
कोणाचा घडा भरतोय. कोणाचं नशीब उजळतंय तर काहींना प्रयत्नांतीही यश मिळत नाही. कोणाकडील सगळी संपत्ती तो ओरबाडून घेतो. सगळं काही काढून घेतो तर कोणाला अनपेक्षित धनलाभ होतो. फारशी पात्रता नसणारी व्यक्तीही यशाच्या पायर्‍या चढते. संपन्न-समृद्ध होते तर पात्रता असणार्‍या माणसाची झोळी रिकामीच राहते. अनेकांना अनपेक्षितपणे बरंच काही मिळतं तर अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. यालाच परमेश्वराची लीला म्हणतात. देवाला काहीही वर्ज्य नाही. देव कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर कशाचीही जबाबदारी नाही.
 
माणसाच्या हातात काहीही नाही. परमेश्वरी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तो फक्त प्रार्थना करू शकतो. त्याची करूणा भाकू शकतो. देवाने दिलेल्या गोष्टींवर तो समाधानी राहू शकतो किंवा असमाधानी असू शकतो. उर्वरित सगळं देवाच्या हातात आहे. घडणं आणि बिघडवणं हे सगळं तोच करू शकतो. त्यामुळे देवाचं स्मरण करत राहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा.