चंद्राबाबू नायडू येत्या २ वर्षात जेलमध्ये जातीलः देवधर

    दिनांक :06-Jul-2019
अमरावती (आंध्र प्रदेश),
जेडीएस-काँग्रेसच्या ११ आमदारांनी पदाचा राजीनामा दिल्याने कर्नाटकात राजकीय भूकंप आलेला असताना लवकरच आंध्र प्रदेशात राजकीय भूंकप होणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपाचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे भाजपाचे प्रभारी सुनील देवधर यांनी दिले आहेत. तेलुगु देशम पार्टीचे १८ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावाही देवधर यांनी केला आहे. 

 
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे १८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. चंद्राबाबू नायडू हे पुढील दोन वर्षात जेलमध्ये जातील. त्यानंतर आंध्र प्रदेशात भाजपा राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असेल, असा दावाही सुनील देवधर यांनी केला आहे. टीडीपीच्या आमदारांना माहिती आहे की, भ्रष्टाचारात बुडालेले चंद्राबाबू हे लवकरच जेलमध्ये जातील. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक हे सुद्धा भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यानंतर जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत.
जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. रेड्डी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आंध्र प्रदेशात एकूण १७५ आमदार असून २३ आमदार हे टीडीपीचे आहेत.