नगरपालिका कर्मचाऱ्यास राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मारहाण

    दिनांक :06-Jul-2019
जिंतूर: आ. विजय भांबळे जिंतूर नगरपालिकेच्या कर निरीक्षकास स्वतःच्या घरी बोलावून मारहाण करण्याचा प्रकार  समोर आला आहे. या संदर्भात संबंधीत कर निरीक्षकाच्या तक्रारीवरून आ. भांबळे यांच्याविरूध्द जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर नगरपालिकेचे कर निरीक्षक दत्तराव विश्वनाथ तळेकर हे शुक्रवारी कार्यालयात दैनंदिन कामकाज करत असताना नगरसेवक शामसुंदर मते यांनी त्यांना आ. भांबळे यांनी बोलावल्याचा निरोप दिला.
 

 
 
दुपारी दोन वाजता कामानिमित्त घरी बोलावले आहे असे मते यांनी सांगितल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास तळेकर हे आ. भांबळे यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी भांबळे यांच्या घरासमोर पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पालिकेच्या अध्यक्षांचे पती कफीलूर रहेमान फारूखी आणि लिपीक श्रीकांत राजाभाऊ आडणे हे हजर होते. हे सर्वजण आ. भांबळे यांच्या घरासमोर थांबलें असताना बंगल्यावरील व्यक्तीने या सर्वांना आत बोलावले.
यावेळी आ. भांबळे यांनी तळेकर यांना तुम्ही 2015 पर्यंतचे खरेदीखत, विक्री करारनामा अशा मालमत्तांचे नगरपालिकेच्या रेकॉर्डला नोंदी घ्याव्यात, सर्वेक्षण करावे असे सुचवले. त्यावर नोटरीवरील खरेदीखताच्या नोंदी मला थेट घेता येणार नाहीत. त्याकरीता पालिकेचा ठराव आणि मुख्याधिकार्‍यांची मान्यता लागेल असे तळेकर यांनी स्पष्ट केले.
त्यावर ठराव घ्या किंवा काय करायचे ते करा पण अतिक्रमीत लोकांच्या मालमत्तेच्या नोंदी नियमीत करा असे भांबळे यांनी सुचवले. शहरातील एकलव्य शाळेच्या घरपट्टी, पाणीपट्टीच्या माफी संदर्भात तळेकर काहीच कार्यवाही करत नाहीत असे यावेळी फारूखी म्हणाले असता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न तळेकर यांनी केला. त्यावर ‘तळेकर तू काम करीत नाहीस, नुस्ता बहाणा लावतोस, एकलव्य शाळेची घरपट्टी माफ करण्याबाबत तू कार्यवाही कर’ असे आ. भांबळे म्हणाले.
 याबाबत ठराव घेण्यासंबंधी आपणाकडून पुनश्च पालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सुधारित ठराव पारीत झाल्यानंतर मुख्याधिकार्‍यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे तळेकर यांनी सांगितले त्यावर आ. भांबळे चिडले. आ. भांबळे यांनी आपणास शिवीगाळ करत स्वतःच्या खुर्चीतून उठून मारहाण केल्याची फिर्याद तळेकर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दिली. याप्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे.