धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला: आयसीसी

    दिनांक :06-Jul-2019
लंडन, 
महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काढले आहेत. धोनी उद्या ७ जुलै रोजी ३८ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने धोनीच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्याच्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. 

 
धोनीने कर्णधारपदाच्या काळात आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयसीसी वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स करंडक जिंकण्याचा विक्रम करणारा धोनी पहिलाच कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं. याशिवाय धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएल स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे.
 
 
धोनीच्या याच कामगिरीचा आढावा घेणारा एक व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये धोनीने साकारलेल्या खेळींचा उल्लेक तर आहेत. पण कर्णधार विराट कोहली, अव्वल क्रमांकाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर, बेन स्टोक्स यांचीही धोनीबद्दलची मते जाणून घेतली आहेत.
 
आयसीसीने व्हिडिओ ट्विट करताना धोनीचा उल्लेख भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा खेळाडू असा केलाय. तर धोनी कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्थान असल्याचेही मत व्यक्त केले आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीने दिलेली ही भेट उल्लेखनीय आहे.