भारताचा श्रीलंकेवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय

    दिनांक :06-Jul-2019
लीड्स,
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारताने या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला. 
पण भारत हे अव्वल स्थान कायम राखणार का, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर समजू शकणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर भारताला अव्वल स्थान कायम राखता येईल आणि त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना करावा लागेल. पण जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि त्यांचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडशी होईल.
श्रीलंकेच्या २६५ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना रोहित आणि राहुल यांनी दमदार १८९ धावांची सलामी दिली. रोहितने या शतकासह एका विश्वचषकात पाच शतके लगावण्याचा इतिहास रचला, त्याचबरोबर या विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये अव्वल स्थानही पटकावले. रोहितने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या. राहुलचे हे विश्वचषकातील पहिले शतक ठरले. राहुलने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १११ धावा केल्या.
अँजेलो मॅथ्यूजचे शतक आणि लहिरू थिरीमानेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना 264 धावांपर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने यावेळी ११३ धावांची खेळी साकारली, तर थिरीमानेने ५३ धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराने यावेळी सर्वाधिक तीन बळी मिळवले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे पहिल्या काही षटकांत समोर आले. कारण श्रीलंकेला आपले चार फलंदाज फक्त ५५ धावांमध्ये गमवावे लागले. पण त्यानंतर मात्र अँजेलो मॅथ्यूज आणि लहिुरु थिरीमाने यांनी शतकी भागीदारी रचली आणि संघाला स्थैर्य मिळवून दिले. मॅथ्यूजने या सामन्यात शतक झळकावले, पण थिरीमानेला मात्र अर्धशतकावरच समाधान मानावे लागले. थिरीमानेने चार चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.