CWC2019: ICCच्या ‘त्या’ ट्विटवर पाकिस्तानचे चाहते नाराज

    दिनांक :06-Jul-2019
लंडन, 
आयसीसी विश्वचषकात शुक्रवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केलेल्या एका ट्विटवर पाकिस्तानच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

 
 
इमाम-उल-हक (100) व बाबर आझमच्या (96) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 50 षटकात 315 धावा उभारल्या. पाकिस्तानचा डाव संपल्यावर आयसीसीने ट्विट करत, पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेश संघाला 7 धावांमध्ये बाद करावे लागेल, असे म्हटले. एवढेच नव्हे, तर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या डम्ब अँड डम्बर या हॉलिवूड चित्रपटातील एक दृश्यसुद्धा जीआयएफ क्लिपच्या स्वरुपात टाकले. या क्लिपमध्ये अभिनेता जिम कॅरी आनंदित होऊन म्हणतो की, आपल्या म्हणण्याप्रमाणे अजूनही संधी गेलेली नाही?, अशा शब्दांत आयसीसीने अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला खोचक टोला मारला. या ट्विटवर पाकिस्तानच्या चाहत्यांनी आयसीसीवर नाराजी व्यक्त केली.
 
 
 
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेश संघाला 7 धावात रोखणे आवश्यक होते. मात्र, बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी पहिल्या दोन षटकामध्ये ही अशक्यप्राय संधी काढून टाकली व पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेबाहेर गेला.
 
 
 
यानंतर पाकच्या चाहत्यांनी आयसीसीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले. यात पाकिस्तानला विश्वचषकाबाहेर ठेवण्यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतीय संघाने खेळलेली मोठे षड्‌यंत्र आहे, असा आरोपसुद्धा ट्विटमधून करण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्याच्या समर्थकांना त्रस्त करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही आयसीसीवर आरोप केला. आयसीसीचे ट्विटर अकाऊंट इतर भारतीय चाहत्यांच्या नियंत्रणाखाली होते, असेही पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.