रोहित शर्माचे वर्ल्डकपमधील पाचवे शतक

    दिनांक :06-Jul-2019
नवी दिल्ली,
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाजांची चौफेर धुलाई करीत खणखणीत शतकं ठोकणाऱ्या 'हिटमॅन' रोहित शर्मा यानं आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही दणदणीत शतक ठोकले आहे. या शतकाबरोबरच त्यानं आणखी एका विश्वविक्रमाची नोंद केली आहे. एकाच विश्वचषकात सर्वाधिक ५ शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या सामन्यात त्यानं बांगलादेशविरुद्ध शतक ठोकून श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या शतकाची बरोबरी साधली होती. आज श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ९२ चेंडूत दणकेबाज शतक ठोकून त्यानं संगकाराचा विक्रम मोडीत काढून आपणच वर्ल्डकपमधील 'बिग बॉस' असल्याचे दाखवून दिले आहे. 

 
श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यातील रोहितचे हे सलग तिसरे शतक ठरले. तर या यंदाच्या वर्ल्डकमधील त्याचे हे आजचे ५ वे शतक ठरले. श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराने २०१५ च्या विश्वचषकात ४ शतकं ठोकण्याचा 'विश्वविक्रम' केला होता. तिसऱ्या स्थानावर मार्क वॉ आहे. वॉने १९९६ साली ३ शतकं ठोकले होते. चौथ्या क्रमांकावर भारताचा सौरभ गांगुली असून सौरभने २००३ साली ३ शतकं ठोकले होते. श्रीलंकेविरुद्ध केलेल्या या शतकामुळे रोहितनं आणखी एका विक्रमाची बरोबरी साधली. वर्ल्डकपमध्ये ६०० धावा करणारा रोहित शर्मा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याआधी विश्वचषकात हा विक्रम केला होता. सचिन तेंडुलकरने २००३ साली दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषकात ६७३ धावा केल्या. या धावा आतापर्यंतच्या वर्ल्डकमधील सर्वात जास्त धावा आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या. तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने या वर्ल्डकपमध्ये ६०६ धावांचा टप्पा ओलांडला आहे.
एका वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त शतक ठोकणारे खेळाडू
  •  रोहित शर्मा ५ शतक (२०१९*)
  •  कुमार संगकारा ४ शतक (२०१५)
  •  मार्क वॉ ३ शतक (१९९६)
  • सौरभ गांगुली ३ शतक (२००३)
  • मैथ्यू हेडन ३ शतक (२००७)