मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेचे भारतासमोर २६५ धावांचे आव्हान

    दिनांक :06-Jul-2019
हेडिंग्ले,
अँजलो मॅथ्यूजच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने भारतीय संघासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान दिलं आहे. मॅथ्यूजने १२८ चेंडूत ११३ धावांची खेळी साकारली. यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
 

 
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी स्विकारली. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडलं. अवघ्या ५५ धावांवर श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी परतले होते.
श्रीलंका बिकट स्थितीत असताना अँजलो मॅथ्यूज संघासाठी धावून आला. मॅथ्यूजनं आपल्या अनुभवाचा चोख वापर करत खेळपट्टीवर जम बसवला आणि संघाच्या धावसंख्येला सावरलं. लाहिरु थिरिमाने याने अर्धशतकी खेळी साकारून मॅथ्यूजचा चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि संघाला दोनशे पार नेलं. डीसिल्वानं ३६ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी साकारली. बुमराहने श्रीलंकेला तीन धक्के दिले. तर भुवनेश्वर कुमार, पंड्या, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.