नितेश राणेची राजकीय नौटंकी!

    दिनांक :06-Jul-2019
 चौफेर 
सुनील कुहीकर  
 
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवलीच्या उपरस्त्यांची दुर्दशा झाली आहे. कालपरवाच तयार झालेल्या या मार्गांची ही अवस्था ‘साहेबांना’ बघवली नाही. पुरता तिळपापड झाला त्यांचा. कणकवली म्हणजे साहेबांच्या बापजाद्यांची मालमत्ताच नाही का? अन्‌ ते तर स्वयंघोषित राजेच तिथले. त्यांच्या दरबारात हजर झालेल्यांना कचर्‍यासारखे वागवणे, हा पूर्वापार परंपरेने पायाशी चालून आलेला अधिकार त्यांचा. आणि जनता? ती तर खिजगणतीतही नाही कुणाच्याच. इतकी वर्षे साहेबांनी राज्यकारभार चालवला. आता त्यांची पोरं राजकुमाराच्या दिमाखात वागू लागली आहेत. आडनाव राणे असणे एवढीच मर्यादित पात्रता अंगी असण्यातूनही केवढी मुजोरी अंगात भिनली आहे बघा! या रस्त्याची ही अवस्था बघून संतापले ते. म्हणाले, हजर करा संबंधित अधिकार्‍यांना दरबारात. राजा बोले दळ हाले. मग काय, साहेबांचाच हुकूम झालाय म्हटल्यावर लागले सारे कामाला. हजर केले गेले संबंधित अधिकार्‍याला साहेबांसमोर. आता काय घडते, याचा तमाशा बघायला जमाव जमला सभोवताल. आमदारांचा हुरूप तर मग आवरण्यापलीकडे गेला. थेट एकेरीवर येत त्यांनी उच्छाद मांडणे आरंभले. त्या अधिकार्‍यासोबतच्या असभ्य वर्तणुकीचा नाट्यप्रयोग उपस्थितांच्या साक्षीने सुरू झाला. म्हणाले, या रस्त्यांवरील खड्‌ड्यांतून वाहनं गेली की, कडेने चालणार्‍या लोकांच्या अंगावर चिखल उडतो पावसाळ्यात. काही पर्वा आहे की नाही गोरगरिबांची? कधी अनुभव घेतलाय्‌, असा चिखल अंगावर उडण्याचा? साहेब आज असा रुद्रावतार धारण करणार असल्याची पूर्वकल्पना असल्यागत, काही चेल्याचपाट्यांनी लागलीच हाती असलेल्या एका भांड्यात खड्‌ड्यातला चिखल घेतला अन्‌ ओतला त्या अधिकार्‍याच्या अंगावर. त्यापूर्वी नितेशसाहेबांनी त्या अधिकार्‍यासोबत शिमगा साजरा करून झाला होता. या एकूणच प्रकरणाचा ‘समारोप’ चिखलफेकीने झाला.
 

 
 
एका प्रशासकीय अधिकार्‍याला अशा तर्‍हेने सार्वजनिक रीत्या अपमानास्पद वागणूक मिळालीय्‌ म्हटल्यावर त्याच्या तिखट प्रतिक्रिया उमटणे, अधिकारी संघटना त्यांच्या अधिकाराबाबत पेटून उठणे स्वाभाविक होते. प्रत्यक्षात तसे घडलेही. इकडे, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही साहेबांचा तोरा कायम होता. तोच राग. टीपेला पोहोचलेल्या आवाजाची धारही तशीच कायम. जणूकाय देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढा लढला होता साहेबांनी. कोण आहेत हे नितेश राणे? नारायणरावांचे चिरंजीव असण्याच्या पलीकडे लायकी अन्‌ कर्तृत्व काय त्यांचे? त्याच भरवशावर आमदारकी पदरी पडलेली असताना त्याचा एवढा माज? ही लोकशाही आहे की राजेशाही? राजाच्या समोर दरबारात जनतेने निमूटपणे उभे राहण्याचा शिरस्ताच पाळत होते जणू राणेंसमारे उभे असलेले ते अधिकारी. हाताची घडी बांधलेली. तोंडावर बोट ठेवण्याशिवाय तर पर्यायही नव्हता. काही बोलायला गेलं तर चढ्या आवाजात आमदार लागलीच त्यांच्यावर हावी व्हायचे.
 
काय चाललंय्‌ हे? तिकडे मध्यप्रदेशातल्या एका आमदाराला, सरकारी अधिकार्‍याने अतिक्रामकांवर केलेली कारवाई पचनी पडत नाही. तो सरळ क्रिकेटची बॅट घेऊन त्या अधिकार्‍यावर चाल करून जातो. इकडे पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात एक अधिकारी, कालपरवा राजकारणात आलेल्या, वडिलांच्या पुण्याईने आमदार झालेल्या एका नवख्या उमेदवाराच्या लोकहिताच्या नावावर केलेल्या नौटंकीचा बळी ठरतो. काय तमाशा मांडलाय्‌ या लोकांनी? अधिकार्‍यांनी कसं वागलं पाहिजे, हा चर्चेचा मुद्दा नक्कीच आहे. ते त्यांच्या कर्तव्यात जराही कसूर करीत नसल्याचा दावा तर चुकूनही कुणाला करता येणार नाही. बहुतांश सरकारी बाबू खाबुगिरीत तरबेज आहेत, ते सर्वसामान्य नागरिकांना कस्पटासमान वागवतात, याही बाबतीत कुणाचेच दुमत नाही. इतकेच कशाला, सरकारी नोकरी, त्याआडून प्राप्त होणारी पदं, अधिकार, मानमरातब, सोयी-सुविधा या भरवशावर अक्षरश: चैन चालली असते या यंत्रणेची, हेही दुर्दैवी वास्तव आहे या लोकशाहीव्यवस्थेतले. सामान्य जनता कुठेही अजेंड्यावर नाही त्यांच्या. सरकारी कार्यालयात सामान्यजनांची होणारी हेळसांड, हाही चिंतेचा विषय आहे खरंतर! पण, म्हणून आकाश विजयवर्गीय, नितेश राणे यांना कुणी अधिकार दिला त्या अधिकार्‍यांना झोडपून काढण्याचा? सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनसेवेची ही कोणती तर्‍हा झाली?
 
नितेश राणे यांनी एका सरकारी अधिकार्‍यावर झाडलेला रौब आणि त्यांच्या उपस्थितीने आपसूकच मिळालेल्या बळाने चेकाळलेल्या चेल्याचपाट्यांनी अधिकार्‍यांना दिलेला चोप, ही काही जनरोषाची स्वाभाविक प्रक्रिया नाही. तो नितेश यांना जनतेने बहाल केलेल्या आमदारकीच्या पदाआडून आलेल्या माजोरीचा स्वाभाविक परिणाम आहे. स्थानिक जनतेवर धाक निर्माण करण्याच्या आजवरच्या सवयीचाही तो परिपाक आहे. लोकशाहीव्यवस्थेत प्रत्येक स्तंभाची स्वत:ची, स्वतंत्र अशी जबाबदारी आहे. आजघडीला कोण पूर्ण करतोय्‌ हो स्वत:ची जबाबदारी? कोणत्या स्तंभातील लोकांना दावा करता येईल, त्यांच्या वर्तणुकीतून ते लोकशाहीव्यवस्था मजबूत करीत असल्याचा? कुणाचा सहभाग नाही या यंत्रणेचे तीनतेरा वाजवण्यात? कोण नाही या भ्रष्ट व्यवस्थेतला भागीदार? उरलेल्या तिसर्‍या काय नि चौथ्या काय, कुठल्याच स्तंभाला यातून वेगळे करता येणार नाही, अशी केविलवाणी अवस्था निर्माण केली आहे सगळ्यांनी मिळून. या स्थितीत कुणाला अधिकार उरतो इतरांना धारेवर धरण्याचा? असलाच तर तो अधिकार नागरिकांना आहे. पण, जनतेची तर ‘मुकी बिचारी’ अवस्था करून टाकलीय्‌ इथे सर्वांनी. अन्‌ आता जराशा प्रसिद्धीसाठी, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, राजकारणाचे डाव साधण्यासाठी, टुकार लोकप्रियतेसाठी या पद्धतीने पातळी सोडून वागण्याची स्पर्धा लागलीय्‌ लोकांमध्ये? काय कर्तबगारी आहे त्या आकाश विजयवर्गीय अन्‌ नितेश राणेची? राज्याचे कोणते प्रश्न सोडवलेत त्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून? कोणत्या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करून इतिहास निर्माण केल्याची नोंद त्यांच्या नावे आहे? वडिलांचे नाव अन्‌ कुटुंबाचे आडनाव बाजूला ठेवून, स्वत:च्या कर्तबगारीच्या भरवशावर मैदानात उतरण्याची हिंमत तरी करता येईल या दोघांनाही? मग कुठून आला हा माज त्यांच्या अंगात? ज्यांनी त्यांच्या पदरात आमदारकी टाकली त्या मतदारांनीच याचा विचार केला पाहिजे. हा माज उतरवण्याची जबाबदारीही जनतेची आहे आणि त्यासाठीचे मार्गही तिलाच शोधायचे आहेत.
 
अर्थात, आमदार म्हणून नितेश राणे यांनी परवा केलेल्या कृत्याचे कुठल्याही अर्थाने समर्थन करणे योग्य ठरणार नसले, तरी सरकारी अधिकार्‍यांचे बेजबाबदार वागणे तरी कुठे दडवता येणार आहे? आपण जनतेचे सेवक आहोत, याचे तर भानही अपवादानेच उरलेले दिसते आताशा. कित्येकांच्या बाबतीत तर पदरच्या पद, प्रतिष्ठा, पैसा अन्‌ अधिकारातून शालीनतेचा गळा घोटला गेला आहे. ज्याच्या भरवशावर या बाबी वाट्याला आल्यात, त्या जनतेला थारा नसतो यांच्या दरबारात. खरंतर त्यांचेच प्रश्न सुटत नाहीत इथे. हक्काच्या प्रमाणपत्रांसाठी उंबरठे झिजवावे लागतात, चिरीमिरी द्यावी लागते, खेपा माराव्या लागतात. रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांपासून तर तज्ज्ञ अभियंत्यांनी बांधलेली धरणं फुटण्यापर्यंतचे प्रकार लोकांनीच सहन करायचे असतात. त्याचे परिणामही त्यांनीच भोगायचे असतात. अगदी आत्महत्यादेखील शेतकर्‍यांनीच करायच्या असतात. इतर कुणाच्या बा चं काय जाणार असते? कधी बघितलं का या रस्त्याने जाताना अंगावर चिखल कसा उडतो तो, असा सवाल करीत खड्‌ड्यातला चिखल जमा करून त्या सरकारी अधिकार्‍यावर उडवणार्‍या नितेश राणेंनी तरी कधी अनुभवला सांगा तसला प्रसंग? एरवी अलिशान गाडीतून खाली उतरायचं नाही अन्‌ मतांचे राजकारण करण्यासाठी असली नाटकं करायची. पण, राणेंचे वागणे लोकांच्या लेखी केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरणे, एरवी या अधिकार्‍यांना असाच धडा शिकवला पाहिजे, असे सामान्य जनतेला वाटणे, या जनभावनेतून काही शिकलं पाहिजे, प्रशासकीय अधिकार्‍यांनी. राणेंचे वागणे, व्यक्त होण्याची त्यांची पद्धत चूक असली, तरी अधिकार्‍यांबाबतची जनभावना तरी कुठे त्याहून वेगळी आहे?
9881717833