नीरव मोदीला दणका; पीएनबीला व्याजासहित ७३०० कोटी रुपये देण्याचे आदेश

    दिनांक :06-Jul-2019
पुणे, 
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून देशातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्यातील कर्ज वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) मोठा दणका दिला आहे. व्याजासहित ७३०० कोटी रुपये नीरव मोदीने पीएनबीला चुकते करावेत असा आदेश डीआरटीने दिला आहे.
 
 
 
यापूर्वी सिंगापूरच्या हायकोर्टाने नीरव मोदीला झटका देताना ब्रिटनमध्ये नोंदणीकृत असलेली कंपनीचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले होते. या खात्यात त्याचे ४४.४१ कोटी रुपये आहेत. या खात्याचे लाभार्थी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदी आणि मेव्हणा मयांक मेहता हे आहेत. ईडीने मांडलेल्या मुद्द्यानुसार निर्णय देताना कोर्टाने सांगितले होते की, या खात्यातील पैसा हा गुन्ह्यातील पैसा आहे. यामध्ये पीएनबी घोटाळ्यातील रक्कम अवैध पद्धतीने पाठवण्यात आला आहे.
 
 
 
त्याचबरोबर स्वित्झर्लंडच्या प्रशासनानेही २७ जूनला नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीच्या चार स्विस बँकेच्या खात्यांमधून होणारे व्यवहार रोखले होते. भारतात नीरव मोदी विरोधात सुरु असलेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली होती. सध्या या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा आहेत.