काँग्रेसचा नवा अध्यक्ष तरुण असावा : कॅ. अमरिंदर सिंग

    दिनांक :07-Jul-2019
चंदिगड,
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर केवळ तरुण नेताच काँग्रेसला पुनरुज्जीवित करू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. 

 
कॅ. अमरिंदर सिंग पुढे बोलताना म्हणाले की, ‘काँग्रेसच्या कार्यकारिणीने राहुल गांधींच्या जागी अशी व्यक्‍ती शोधावी जिचे व्यक्‍तिमत्त्व जादूई असेल. ती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल. ज्याची नाळ तळागळातील कार्यकर्त्यांशी जोडली असेल. गांधी यांनी पक्षामध्ये जिवंतपणा आणून त्याला उंचीवर नेण्यासाठी मार्ग दाखवून दिला आहे. आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 65 टक्‍के तरुण आहेत. त्यामुळेच हे नैसर्गिक आहे की, तरुण नेताच आजच्या तरुणांच्या इच्छा-आकांक्षा समजू शकेल. त्यामुळेच राहुल गांधींसारख्या तरुण नेत्याने काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणे हे दुर्दैवी आहे. आता त्यांच्या जागी दुसऱ्या तरुण नेत्याची निवड करणे गरजेचे आहे’.
या नेत्याकडे देशाला पुढे नेणारा दृष्टिकोन असायला हवा. त्याने केवळ देशातील बहुसंख्य तरुणांशीच कनेक्‍ट न होता पक्ष कार्यकर्त्यांना ताज्या विचारांचा डोसही द्यायला हवा. याद्वारे त्याला विद्वेष आणि विभाजनाचे राजकारण करीत देशाला मागे नेणाऱ्या सत्ताधारी भाजपाला टक्कर देता येईल. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुण नेत्याने दूर दृष्टिकोन ठेवून नव्या भारताच्या जन्माचा मार्ग शोधावा. हा मार्ग अधिक प्रगतीशील असेल. त्यामुळे जुन्या नेत्यांनी नव्या नेत्यांसाठी मार्ग मोकळा करून देण्याची आता हीच वेळ आहे, असंही मत कॅ. अमरिंदरसिंग व्यक्त केले.