एअर इंडियाचे सर्व शेअर्स विकण्याचा सरकारचा निर्णय ?

    दिनांक :07-Jul-2019
दिल्ली,
मागील काही वर्षांपासून डबघाईत असलेल्या एअर इंडियाचे सर्व शेअर्स विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापासून एअर इंडियाची विक्री प्रक्रिया थांबली होती. ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 
एअर इंडिया १० वर्षापेक्षा जास्त तोट्यात जात होती. नीती आयोगाने एअर इंडियाचे १०० टक्के शेअर्स खाजगी कंपन्यांना विकण्यात यावे असा सल्ला दिला होता. मागच्या वर्षामध्ये सरकारने एअर इंडियाचे ७४ टक्के शेअर्स विक्रीस काढले होते. त्यासाठी लिलाव करण्यात आला होता. या लिलावाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला होता. एअर इंडियाचे १०० टक्के शेअर्स विक्रीस काढले तरच खाजगी कंपन्या एअर इंडिया विकत घेण्याचा सकारात्मकपणे विचार करतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचे १०० टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लवकरच या निर्णयाची तात्पुरती घोषणा करण्यात येऊ शकते. पण डबघाईत निघालेल्या एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक कितपत उत्सूक असतील याबद्दल शंकाच व्यक्त केली जात आहे.