हरयाणवी अभिनेत्री सपना चौधरीचा भाजपामध्ये प्रवेश

    दिनांक :07-Jul-2019
नवी दिल्ली,
हरयाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या माध्यमातून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तिने भाजपामध्ये प्रवेश केला.
 
 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. या मोहीमेमध्ये सहभाग घेत सपनाने भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य नेते उपस्थित होते.
 
 
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती, त्यानंतर ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही सांगण्यात आले होते. मात्र या साऱ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण सपनाने त्यावेळी दिले होते.