काय म्हणता देवा पीक-पाणी?

    दिनांक :07-Jul-2019
काय म्हणते पीकपाणी अन्‌ पाऊसही? आता या दिवसांत आणखी कुठली विचारपूस करणार? एकतर मुलांची ॲडमिशन कुठे नि कशी झाली अन्‌ दुसरा सवाल हाच की पीकपाणी कसं आहे? दोन्ही ठिकाणी पेरणीच होत असते. दहावी- बारावीचे निकाल लागल्यावर मुलांचे प्रवेश होत असतात. त्यासाठी पालक बिचारे त्यांच्या खिशात, बँकेत अन्‌ घरात असलेलं किडूकमिडूक विकून मुलांच्या भविष्याची तजवीज करत असतात. शेतकरीही नेमके तेच करतात. घरात असेल नसेल ते विकून बी-बियाणं, खते विकत घेतात अन्‌ पेरण्या आटोपतात. त्यानंतर सगळेच कसे पावसावर अवलंबून असते. तिकडे पालक मुलांसाठी जी काय पेरणी करतात ते मुलांच्या मेहनतीवर अवलंबून असते. अर्थात शिकावू मुलांचे पालक अन्‌ शेतकरी दोघांचीही पेरणी उलटण्याची शक्यता दाटच असते. इकडे पाऊस नाही आला तर पेरण्या वाया जातात अन्‌ तिकडे मुलांनी मेहनत केली नाही तर सारेच पाण्यात जाण्याची शक्यता असतेच. आजकाल मुलांचे पर्सेंटेज फुगवून शैक्षणिक दुकानदारी उभी केली जाते. उत्पादन खर्चावर आधारित भाव दोन्हीकडे आजकाल मिळत नाही. दोन्हीकडे नेमके तेच होते. इकडे एकानं सोयाबीनवर कमावलं की सारेच सोयाबीन पेरतात अन्‌ तिकडे इंजिनीयर होऊन कुणी मोठं पॅकेज मिळविलं की सगळेच माय-बाप आपली मुलं इंजिनीयर करण्याच्या मार्गी लागतात. भाव दोन्हीकडे पडतातच...यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमीच पडेल, असे भाकीत होते. भेंडवळच्या घटमांडणीपासून तर पंचांगापर्यंत सारेच नक्षत्र अन्‌ ग्रहतार्‍याचा अंदाज मांडून पाऊस उत्तम असेल, असे सांगत होते. हवामानखाते अन्‌ विदेशी हवामानसंस्थाही तेच सांगत होत्या. जूनच्या सुरुवातीला खरेतर थोडा पाऊस येतो; पण यंदा तो आलाच नाही. दरवर्षी 22-23 जून नंतरच पाऊस येत असतो. यंदा तर जूनच्या अखेरीस पाऊस आला. पाऊस बेटा जिथे पडायचा तिथे नाही पडत. मुंबईत म्हटलं तर पावसाची गरज नसते. आता एन्जॉय म्हणून ठीक आहे, पण पावसाचा संबंध शहरांमध्ये फारच फार कांदाभजी अन्‌ वाफाळलेला चहा इतकाच असतो. पुरुष मंडळी आपली बायकोची नजर चुकवून बाहेर आपले ‘लिटल- लिटल’ करून येतात. बाहेर पाऊस पडत असताना शाळा- कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली जाते. ऑफिसेसही ट्रॅफिक सारखे जाम असतात. त्यामुळे घराच्या असलेल्या खिडकीतून पाऊस बघत मग गज़ल ऐकल्या जातात किंवा गारवाची सीडी लावून, ‘अचानक ढगांमध्ये कुठून गारवा येतो?’ या प्रश्र्नाचे उत्तर शोधले जाते. शहरांना पाणी हवे असते ते पिण्यासाठी, वापरसाठी. हा झाला डायरेक्ट उपयोग. इन्डायरेक्ट उपयोग हा की, पाणी धरणांत साठवून त्यापासून वीज तयार करायची अन्‌ शहरांतले मॉल्स, बड्या अधिकार्‍यांचे ऑफिसेस, मंत्रालय यात एसी जाळायचे.
आता शहरात पाऊस आला की त्रेधा उडते. मुंबईपासून ठाण्यापर्यंत आता इमारती अन्‌ भिंती कोसळू लागल्या आहेत. लोकल थांबल्या. शहरात पाणीच पाणी साचले. स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी शहरांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता यंदा पाऊस आलाच नाही अन्‌ आला तर तो मुंबईतच आला. आमच्या गावातल्या एका इच्चक माणसाची प्रतिक्रिया अशी की, पाऊस मुंबईत जास्तचा येण्याचे काही कारणं आहेत. एकतर मुंबईत मोठी, मोठी माणसं राहतात. ज्यांना आपण ‘शेलीब्रेटी’ म्हणतो. त्यातल्या त्यात मुंबईत हिंदी शिनम्याच्या हिरोना रायतेत, म्हंजे सौंदर्य साबनानं अंघोळ करणार्‍या नावनाव हिरोइना रायतेत म्हून पावसाले तिकडेच पडावं वाटते. आपल्यासारखे डाऊनमार्केट लोक भिजवण्यात पावसाला इंट्रस्ट असतच नाही... त्यातच मुंबईत मोठाल्या इमारती आहेत. त्यांना वारे अडतात अन्‌ पाऊस तिकडे पडतो. त्यामुळे झाडे लावण्यापेक्षा मोठ्या इमारती गावखेड्यांतही बांधल्या पाहिजे, असा आमच्या त्या रंगरुटचा सल्ला आहे. तिसरे कारण काय? तर मुंबईत राज्याचे सरकार असते. सरकार असले की सुरक्षा असते. तातडीने निर्णय घेतले जातात. प्रत्यक्षात देवेंद्र म्हणजे इंद्रच तिथे राहतो म्हणून मग पाऊस तिकडेच नाही पडणार तर काय? त्याचा हा सवाल विचार करण्यासारखा आहे. आता गेल्या वर्षी नागपूर- विदर्भातही पाऊस पडला होता. कारण? मागच्या पावसाळ्यात सरकार विदर्भात होते. नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्यात आले, म्हणून इकडे पाऊस पडला. यंदा अधिवेशन तिकडे मुंबईतच झाले म्हणून पाऊस तिकडे पडला!
आता तिकडे असा जोरदार पाऊस सुरू होता मग विदर्भात आता सगळीकडे पाऊस आला. हवामानखात्याचा अंदाज पहिल्यांचा खरा ठरला. तिकडे अतिवृष्टी होईल, असे हवामानखात्याने म्हटले होते. तसेच झाले. तसा पाऊस दीडच दिवस आला. नंतर मात्र ऊन पडले. आधी दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी धास्तावला होता. आता वर्धा जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमिनीतली पीकं खरडून नेली पावसाने.
पावसानं इचिन कहरच केला
लोक म्हणे नागोबुडा वाहूनच गेला
अशी आमच्या शंकर बडे यांची कविता आहे.
सोसून सोसून सोसावं तरी किती छपरानं?
गळावचं नाही का बिचार्‍यानं?
असं लिहिणारे हे वर्‍हाडीतले मोठे कवी. तीन वर्षांपूर्वी पोळ्याच्या दिवशीच गेले कायमचं सोडून...
आता तिकडे पाऊस, मुंबईत पाऊस अन्‌ इकडे मराठवाड्यात पाऊसच नाही. तिकडे पावसानं हवामानखात्याचा मान राखला. अंदाज खरा ठरवला अन्‌ इकडे मराठवाड्यात काही पाऊस पडलाच नाही. दुबार पेरणीचे संकट आहे. मराठवाड्यात यंदा मान्सूनपूर्वही पाऊस पडला नाही. त्यामुळे त्यावेळी ज्या पेरण्या उरकून घेतात त्याही झाल्या नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकर्‍यांसमोर उभं राहण्याची शक्यता मराठवाड्यात तरी नाही. त्यामुळे शेतकरी अजूनच खचणार आहे. यंदा मराठवाड्यात पेरण्याच नाही. विदर्भात आता काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत अन्‌ आता पावसानं पुन्हा दडी मारल्यागत आहे. आता पावसाचा हा असा ताल काही परवडेनासा आहे. आषाढ लागला तरीही पाऊस नाही. पोरांच्या शाळा सुरू झाल्या, वारकरी पंढरीकडे चालते झाले आहेत. आता 12 जूनला आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी देव मग झोपी जातात म्हणे चार महिने. म्हणजे आचारसंहिता लागू होते देवांची. म्हणजे काही कामे होत नाही. नेमके सरकारही आता राहणार नाही, कारण विधानसभेच्या निवडणुका लागतील. कदाचित ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे देव झोपण्याच्या आधी प्रार्थना करून घ्या अन्‌ सरकार आचारसंहितेत फसण्याच्या आधी ज्या काय मागण्या पूर्ण करायच्या त्या करून घ्या... वर्‍हाडात बरा म्हणावा तसा पाऊस पडला आहे अन्‌ पूर्व विदर्भ अजूनही कोरडा म्हणावा, असाच आहे. काही नवे मंत्री मिळाले अन्‌ काही नवे पालकमंत्रीही. धरणे कोरडी आहेत. मृत पाणीसाठा आहे. आता आला तो पाऊस विदर्भात पाव्हण्यासारखा आला आहे अन्‌ मराठवाड्याशी तर तो दुश्मनासारखाच वागत आहे. अस्मान असे आचारसंहितेत फसले असताना सरकारकडूनच काय ते होण्याची शक्यता आहे. निवडणुका तोंडावर असल्याने सगळेच राजकीय पुढारी नको तितके जागे आहेत. त्यांना त्यांचं पीक काढायचं आहे. पेरणी तेही करतच आहेत. अशा वेळी जनतेनं आपलं साधून घ्यायला हवं!